अलिबागमध्ये मशाल चिन्हांचे ठाकरे गटाकडून अनावरण
By राजेश भोस्तेकर | Published: October 11, 2022 06:18 PM2022-10-11T18:18:16+5:302022-10-11T18:19:23+5:30
शिवसैनिकांनी मशाल चिन्ह घेऊन छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याला घोषणा देत रिंगण घातले.
अलिबाग : ठाकरे गट शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले असून पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले आहे. पक्षाचे चिन्ह मशाल याचे अनावरण अलिबागमध्ये ठाकरे गटाकडून करण्यात आले. यावेळी बंडखोर आमदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी मशाल चिन्ह घेऊन छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याला घोषणा देत रिंगण घातले.
अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाने मशाल या चिन्हांचे अनावरण केले. यावेळी चौकावर मशाली पेटविण्यात आल्या. जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी मशाल पेटवून आणि नारळ फोडून चिन्हांचे अनावरण केले. उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, तालुकाप्रमुख शंकर गुरव, शहरप्रमुख संदीप पालकर, अजित गुरव, मारुती भगत, अजित पाटील यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना पक्ष फुटून दोन गट निर्माण झाले. त्यानंतर पक्ष कोणाचा हा वाद निवडणूक आयोगाच्या दरबारात गेला. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. त्यामुळे नवीन चिन्हांची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. त्यानुसार निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला दिले. मशाल चिन्हावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणुकीत सामोरे जाणार आहे. मशाल चिन्ह मिळाल्यानंतर अलिबाग शिवसेना तालुका पक्षातर्फे चिन्हांचे अनावरण केले.