ठाकरेंचा बंगला ज्या कोर्लईत, तिथले इतीवृत्त झाले गायब..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 09:51 AM2023-06-14T09:51:28+5:302023-06-14T09:51:47+5:30
कोर्लई ग्रामपंचायतीमधील जून २०११ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीतील मासिक सभेचे इतिवृत्त आणि महत्त्वाची कागदपत्रे गहाळ
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या मालकीच्या कथित बंगल्याच्या प्रकरणापासून चर्चेत आलेल्या कोर्लई ग्रामपंचायतीमधील जून २०११ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत झालेल्या मासिक सभेचे इतिवृत्त आणि महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची बाब समोर आली आहे. त्याबाबतच्या कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन ग्रामपंचायतीचे दप्तर धुंडाळण्यात येत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत सर्वजण या कामात गर्क होते.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मुरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रायगड जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे कोर्लई ग्रामपंचायतीच्या कागदपत्राची तपासणी करण्यात गर्क झालेले आहेत. या गहाळ कागदपत्रांमुळे ठाकरे यांच्या मालकीच्या कथित बंगले प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार वायकर याच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे ९ एकर जमीन घेतलेली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटकही झाली होती. मात्र, आता जून २०११ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत झालेल्या मासिक सभांचे इतिवृत्त आणि कागदपत्रे गहाळ झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.