- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे २९ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याप्रसंगी त्यांच्यासोबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, मतदारसंघातील मतदारांचे लक्ष हे प्रामुख्याने आघाडीतील घटक पक्षातील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर आणि शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील या दोन नेत्यांवर अधिक राहणार आहे. ठाकूर आणि पाटील यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य असल्याने दोघांमधून विस्तवही जात नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी दोन्ही नेते एकत्र दिसणार असल्याने ते एकमेकांना कसे ‘रिअॅक्ट’ करतात हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.ठाकूर आणि पाटील हे पारंपरिक कट्टर राजकीय विरोधक आहेत. ठाकूर यांनी सातत्याने पाटील यांच्या विविध व्यवसायांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. सरकारी जमिनीचा अनधिकृतरीत्या वापर करणे, सरकारी कायदे, नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करत असल्याबाबत ठाकूर यांची जमिनीवरील आणि न्यायालयीन लढाईही सुरू आहे.ठाकूर हे सातत्याने पाटील यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडतच असतात. मात्र, पाटील यांनी अद्यापही ठाकूर यांच्या आरोपांना थेट उत्तर देणे टाळले आहे. ठाकूर यांच्याविषयी बोलून त्यांचे महत्त्व कशाला वाढवू असे बोलून नेहमीच पाटील यांनी वेळ मारून नेली आहे.ठाकूर यांच्यामुळेच पाटील यांना एका प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये हजर राहावे लागले होते. ठाकुरांनी शड्डू ठोकून पाटील यांना जाहीर सभांमधून थेट आव्हानही दिले आहे. पाटील हे काहीच प्रतिउत्तर करत नाहीत. त्याचप्रमाणे पाटील यांच्या मनामध्ये काही प्रमाणात ठाकूर यांच्याविषयी आकस नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल.२००४ साली शेकापच्या मीनाक्षी पाटील यांचा पराभव करून काँग्रेसचे ठाकूर हे विजयी झाले होते. बऱ्याच कालावधीनंतर अलिबाग विधानसभा मतदारसंघात ठाकूर यांच्या रूपाने काँग्रेसला आमदार मिळाला होता. मीनाक्षी पाटील या पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी अशी राजकीय व्यूहरचना आखली की ठाकूर यांचा पराभव झाला आणि मीनाक्षी पाटील निवडून आल्या.त्यानंतर २०१४ सालीही शेकापचे सुभाष पाटील यांनीही ठाकूर यांचा पराभव के लाहोता. या सर्व घटनांमुळे दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष हा खदखदत आहे. त्यातच आता आघाडीमध्ये काँग्रेस आणि शेकापही सामील झालेला आहे. तटकरे हे २९ मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याप्रसंगी त्यांच्यासोबत आघाडीतील घटक पक्षातील काँग्रेसचे माजी आमदार ठाकूर आणि शेकापचे सरचिटणीस आमदार पाटील हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट समोरासमोर होणार असल्याने ते एकमेकांशी कसे ‘रिअॅक्ट’ करतील याचीच उत्सुकता मतदारांना लागली आहे.रायगड लोकसभा मतदार संघामध्ये निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्ष जिंकण्यासाठी प्रयत्न करतआहेत.पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढणारशिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २८ मार्च ही तारीख ठरवली आहे. या दिवशीही शिवसेना-भाजपामधील बडे नेते उपस्थित राहणार आहेत. २९ मार्चला आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आघाडी आणि युतीच्या उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्र्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.
ठाकूर आणि पाटील येणार आमने-सामने; कार्यकर्त्यांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:17 AM