विषय समित्यांवर ठाकूर समर्थकांचे वर्चस्व
By admin | Published: December 29, 2015 12:21 AM2015-12-29T00:21:48+5:302015-12-29T00:21:48+5:30
पनवेल नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड सोमवारी पार पडली. अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद सीताताई पाटील यांना मिळाले.
पनवेल : पनवेल नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड सोमवारी पार पडली. अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद सीताताई पाटील यांना मिळाले. तर बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा समितीवर काँग्रेसच्या फुटीर गटातील नगरसेवकांची वर्णी लागली.
पालिकेच्या सभागृहात साडेतीन वाजता शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक गैरहजर राहिले. त्याचबरोबर काँग्रेस गटाच्या सदस्यांनी सभात्याग केला. विरोधी पक्षाकडून अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भरत शितोळी यांनी महिला बालकल्याण सभापतीपदी खांदा वसाहतीतील नगरसेविका सीता पाटील यांनी निवड जाहीर केली. इतर महिला सदस्यांमधून पाटील यांची वर्णी लावून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कामाची पावती दिली.
बांधकाम सभापतीपदी राजू सोनी यांची निवड करण्यात आली. मनोहर म्हात्रे यांना आरोग्याची सूत्र देण्यात आली. गटनेते अनिल भगत यांच्याकडे पाणीपुरवठा समिती कायम ठेवण्यात आली. नगरसेवक गणेश पाटील यांना शिक्षण सभापतीपद देऊन बोळवण करण्यात आली. मंगला राणे यांना स्थायी समितीवर घेण्यात आले. (वार्ताहर)