पनवेल : तळोजा वसाहतीमधील प्रदूषण ही नित्याचीच बाब आहे. गणेशोत्सवात घोट नदीमधील प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थांना गणेश विसर्जन देखील करता आले नव्हते. आता पुन्हा एकदा हीच परिस्थिती उद्भवली आहे. प्रदूषणामुळे घोट नदी पूर्णत: काळवंडली असून नदीला अक्षरश: गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
तळोजा एमआयडीसीतील अनेक रासायनिक कंपन्यांतून बाहेर पडणारे रसायनयुक्त सांडपाणी या नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीच्या पाण्याला उग्र वास येत आहे. हे प्रकार नेहमीचे झाल्याने याविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हाजीमलंग येथे उगमस्थान असलेली ही नदी घोट गाव, तळोजा मजकूर, पेठाळी मार्गे तळोजा खाडीत जाऊन मिळते. येथील स्थानिक रहिवासी तळोजा मजकूर याठिकाणी नदीपात्रात दशक्रिया व विविध धार्मिक विधी करतात. स्थानिकांच्या दृष्टीने पवित्र मानली जाणारी ही नदी प्रदूषणाच्या कचाट्यात सापडल्याने ग्रामस्थांनी संताप्त व्यक्त केला आहे. रविवारी सुटीच्या दिवशी अचानक या नदीचे पाणी पूर्णत: काळवंडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. पाणी वाहून गेल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल, या विचाराने ग्रामस्थांनी रविवारच्या घटनेकडे दुर्लक्ष केले. परंतु सोमवारीसुद्धा हीच परिस्थिती कायम असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाण्यात धाव घेतली. नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असलेल्या संबंधितांचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी पोलिसांकडे केली.उग्र वासामुळे नागरिकांचे मॉर्निंग वॉक झाले बंदया नदीच्या पात्राजवळ तळोजा वसाहत आहे. येथील रहिवासी संख्या देखील झपाट्याने वाढली आहे. येथील अनेक रहिवासी सकाळी नदीच्या पात्रात मॉर्निंग वॉकला जातात. परंतु दोन दिवसांपासून नदीच्या पाण्यातून येणाऱ्या उग्र वासामुळे रहिवाशांनी मॉर्निंग वॉकला जाणे बंद केल्याची माहिती स्थानिक नगरसेवक हरेश केणी यांनी दिली.