-मधुकर ठाकूर
उरण : चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वारंवार उद्भवणारी पुरपरिस्थिती आणि विकासाच्या कामांकडे सातत्याने शासकीय यंत्रणांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणारा चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
देशातील स्वातंत्र्य संग्रामातील २५ सप्टेंबर १९३० साली ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रह इतिहासातील सुवर्ण पान म्हणून ओळखले जाते.या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहात शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यावर जुलमी ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला होता.या गोळीबारात या गोळीबारात धाकू बारक्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी ( चिरनेर ), रघुनाथ मोरेश्वर न्हावी ( कोप्रोली ), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील ( पाणदिवे ), हसूराम बुधाजी घरत ( खोपटा ), आलू बेमट्या म्हात्रे ( दिघोडे ), नाग्या महादू कातकरी आदी आठ आंदोलकांनी हौतात्म्य पत्करले होते.
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात गौरवशाली इतिहास, हौतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी आणि नव्या पिढीलाही इतिहास ज्ञात व्हावा यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथील हुतात्मा स्मारकासमोरच हुतात्म्य दिन साजरा केला जातो.यावेळी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते.हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली जाते.
मात्र ऐतिहासिक चिरनेर गाव विकासांच्या कामांपासून कोसो दूर आहे.आता तर धनदांडग्यांनी रस्ते, नाले आणि गावातील हद्दीत ठिकठिकाणी केलेल्या वाढत्या बेकायदेशीर अतिक्रमणे व बांधकामांमुळे चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होते.मात्र ग्रामस्थांच्या तक्रारींनंतरही याकडे शासकीय यंत्रणेकडून पुर्णपणे दुर्लक्षच केले जात आहे.यामुळे मात्र चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १४ सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत शासकीय यंत्रणेवर रोष व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी प्रशासक विकास मिंडे , ग्रामविकास अधिकारी महेश पवार, पोलीस पाटील संजय पाटील, चिरनेर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, शेकापचे सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, जयेश खारपाटील, समाधान म्हात्रे, समीर डुंगीकर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.शासकीय यंत्रणेवर दोषारोप करतानाच यावेळी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन मान्यवरांच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतला असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.