अलिबाग : राजकारणात नेहमीच चौके छक्के मारण्यात पटाईत असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी क्रिकेट खेळातही आपण खेळाडू असल्याचे दाखवून दिले आहे. शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजित केलेल्या अलिबाग येथील आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या बॉलिंगवर रायगडचे पालकमंत्री उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बॅटवर आलेला बॉल टोलवला आहे. राजकारणात विरोधकांचे हल्ले जसे सामंत परतवून लावतात तसाच खेळातही त्यांनी बॉल टोलावून आपले कसब दाखवले आहेत.
अलिबाग मुरुड विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या एम डी ग्रुप तर्फे दमदार आमदार प्रीमियर लीग २०२४ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन लोणेरे येथील तलवार मैदानावर केले आहे. सोमवार ४ मार्च पासून स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आमदार भरत गोगावले याच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. मंगळवारी ५ मार्च रोजी पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांना यावेळी क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना बॉलिंग केली. यावेळी दोन बॉल सोडल्यानंतर उदय सामंत यांनी अनिकेत यांनी टाकलेल्या बॉलवर उत्तुंग फटकार मारून उपस्थितांना अचिंबित केले. राजकारणसह खेळातही आपण तरबेज असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दाखवून दिले.