शर्यतीतले बैल आगीत हंबरडा फोडत होते; महाडमधील वहूर येथील हृदयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 07:29 AM2023-03-27T07:29:24+5:302023-03-27T07:29:36+5:30
आगीची तीव्रता इतकी होती की, त्यांना सोडविण्यासही अवधी मिळाला नाही.
महाड : महाड तालुक्यातील वहूर या गावात शनिवारी मध्यरात्री एका गुरांच्या गोठ्याला आग लागून जळून खाक झाला. त्यामध्ये शर्यतीसाठी वापरले जाणारे चार बैल होरपळून जागीच ठार झाले. आगीने वेढल्याने बैल हंबरडा फोडत होते, मात्र, आग भडकतच गेल्यामुळे ग्रामस्थ हतबल होते. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाड तालुक्यातील वहूर या गाव हद्दीत झटाम मोहल्ल्यामध्ये सधन शेतकरी रफीक मोहमद सईद झटाम यांच्या राहत्या घराच्या शेजारी त्यांच्या गुरांचा गोठा आहे. शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अचानक त्याला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले आणि संपूर्ण गोठा जळून खाक झाला. त्यामध्ये बांधलेले चार बैल आगीने वेढले गेले. त्यामध्ये होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आगीची तीव्रता इतकी होती की, त्यांना सोडविण्यासही अवधी मिळाला नाही. जनावरांच्या हंबरण्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. ग्रामस्थांनी मिळेल त्या साहित्यातून पाणी घेत गोठ्यावर मारा केला. अखेर महाड नगरपालिका आणि महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला या ठिकाणी पाचारण करावे लागले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ
व्यक्त होत आहे.
दहा लाखांच्या दोन बैलजोडी
चारही बैल खास शर्यतीसाठीचे होते. त्यातील एकजोडी समुद्रकिनारी धावणारी तर दुसरी जोडी माती बंदराला धावणारी होती. रफिक झटाम यांनी एक जोडी कर्नाटकमधून खरेदी केली होती तर एक जोडी अलिबागमधून. त्यांची किंमत सुमारे १० लाखांवर होती, असे त्यांनी सांगितले. आगीत गोठ्यातील अन्य चार लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले.