रायगडमध्ये ‘वंचित’ची उमेदवारी, कोणाची डोकेदुखी ?
By राजेश भोस्तेकर | Published: April 13, 2024 09:15 AM2024-04-13T09:15:16+5:302024-04-13T09:15:43+5:30
इंडिया आघाडीतर्फे उद्धव सेनेकडून अनंत गीते तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
राजेश भोस्तेकर
अलिबाग : रायगडलोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवाराची घोषणा करीत सुनील तटकरे व अनंत गीते यांची डोकेदुखी वाढवली आहे. २०१९च्या निवडणुकीत ‘वंचित’ने उमेदवार देत २३ हजार १९६ मते मिळवली होती. त्यामुळे हा फॅक्टर यावर्षी कोणाच्या पथ्यावर पडणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
इंडिया आघाडीतर्फे उद्धव सेनेकडून अनंत गीते तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. गीते यांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी मित्रपक्ष त्यांच्या प्रचारात अजून उतरलेले दिसत नाहीत. तर तटकरे यांनी उशिरा प्रचार सुरू केला असला तरी ते मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात अडकले आहेत.
२०१४ मध्ये अनंत गीते २,११० मतांनी तर २०१९ मध्ये सुनील तटकरे ३१ हजार मतांनी विजयी झाले.
२०१४ च्या निवडणुकीत
शेकापने रमेश कदम यांना उमेदवारी दिली होती. त्यांना १,२९,७३० मते मिळाली होती.
२०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी यांना २३,१९६ मते मिळाली होती.
यंदाची निवडणूक तटकरे व गीते अशी दुरंगी लढत होईल, असे वाटत होते. मात्र, आता ‘वंचित’ने उमेदवारी घोषित करीत चुरस वाढवली आहे.
महाडच्या कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. चव्हाण या भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष असून, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रायगडमधून मराठा उमेदवार दिला आहे.