शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात ‘पुरातत्त्व'ची बेफिकिरी
By जमीर काझी | Published: October 17, 2022 07:49 AM2022-10-17T07:49:39+5:302022-10-17T07:50:06+5:30
सुरक्षारक्षकांकडून ओवरीचा वापर चौकीसारखा करणे, कपडे वाळविणे, स्वच्छतागृह उभारल्याने बकालपणा आला आहे.
अलिबाग : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावरील समाधीचे पावित्र्य जपण्यात केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून बेफिकिरी होत असल्याचा आक्षेप इतिहास संशोधक व शिवप्रेमींनी नोंदविला आहे.
सायंकाळी सहानंतर गडावर थांबण्यास बंदी आणि ऐतिहासिक ओवरीवर श्वानाच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी पोलिसांचे चौकीस्थळ बनविल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सुरक्षेच्या नावाखाली 'एएसआय' विभागाने महाराजांचा राज्याभिषेक दिन, जयंती, पुण्यतिथी वगळता गडावर राहण्यास बंदी घातली आहे.
सायंकाळी सहानंतर सुरक्षा रक्षकाव्यतिरिक्त अन्य कोणालाही तेथे थांबू दिले जात नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत १,७३५ पायऱ्या चढून येणे शक्य होत नाही. त्याचबरोबर रोप वेसाठी माणसी ५०० ते ६०० रुपये खर्च करणे परवडणारे नाही. सुरक्षारक्षकांकडून ओवरीचा वापर चौकीसारखा करणे, कपडे वाळविणे, स्वच्छतागृह उभारल्याने बकालपणा आला आहे. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी वस्तुस्थितीजनक अहवाल पाठविण्याची गरज आहे.
हा सर्व प्रकार म्हणजे महाराज, शंभुराजेंचा खरा इतिहास पुसण्यासाठीचा एका प्रवृत्तीकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. त्याविरुद्ध चळवळ सुरू केली असून, प्रसंगी ते रोखण्यासाठी न्यायालयातही जाण्याचा निर्धार केला आहे.
डॉ. इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक