मधुकर ठाकूर
उरण : कांद्याच्या निर्यातीवर अचानकपणे वाढविण्यात आलेल्या ४० टक्के करवाढीविरोधात निर्यातदारांच्या पाच दिवसांच्या संघर्षानंतर केंद्र सरकार येत्या दोन- तीन दिवसात निर्यात शुल्क कमी करण्याबाबत सकात्मक निर्णय घेईल असा विश्वास ॲग्रो प्रोडक्ट एक्सपोर्टर असोशिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने शनिवारी अचानक कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मात्र व्यापारी, शेतकरी, निर्यातदार आर्थिक संकटात सापडले आहेत.काही व्यापाऱ्यांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ४० टक्के शुल्क भरुन कांद्याचे कार्गो निर्यात केले आहेत.तर काहींनी ४० टक्के शुल्क परवडत नसल्याने कांद्याचे कार्गो निर्यात करण्याऐवजी जवळच्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आले आहेत.असे जवळपास १०० कांद्याचे कार्गो नजीकच्या बाजारात विक्रीसाठी पाठविले आहेत.तर शुल्क वाढीनंतर आतापर्यंत ४० टक्के शुल्क भरुन सुमारे ६० कार्गो व्यापाऱ्यांनी निर्यात केले असल्याची माहिती ॲग्रो प्रोडक्ट एक्सपोर्टर असोशिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी दिली.
केंद्र सरकारच्या कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क वाढीच्या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी आणि निर्यातदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.याचे पडसाद देशभरात उमटले आहेत.केंद्र सरकारच्या शुल्कवाढी विरोधात उफाळून आलेल्या संघर्षानंतरयाबाबत सकारात्मक धोरण स्वीकारण्याच्या हालचाली केंद्राने सुरू केल्या आहेत.यामुळे केंद्र सरकार येत्या दोन- तीन दिवसात निर्यात शुल्क कमी करण्याबाबत सकात्मक निर्णय घेईल असा विश्वास ॲग्रो प्रोडक्ट एक्सपोर्टर असोशिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी व्यक्त केला आहे.