मतमोजणी निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी
By निखिल म्हात्रे | Published: June 2, 2024 08:35 PM2024-06-02T20:35:48+5:302024-06-02T20:35:59+5:30
अलिबाग - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक करीता 32 रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवार, 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून जिल्हा ...
अलिबाग- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक करीता 32 रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवार, 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली अलिबाग येथे पार पडणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून आज रविवार (दि.२) रोजी मतमोजणी निरीक्षक संजीव कुमार झा यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेले विविध कक्ष, मतमोजणी कक्षाची विधानसभा निहाय रचना, बैठक व्यवस्थापन, निवडणूक अधिकारी कर्मचारी, मत मोजणी प्रतिनिधी आणि उमेदवार यांच्यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधा, आपत्कालीन यंत्रणा, वैद्यकीय कक्ष, अत्यवश्यक सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष या सर्व तयारीची पाहणी केली, तसेच आढावा घेतला.
यावेळी वाहनतळांची जागा निश्चिती, ध्वनीक्षेपक यंत्रणा, वाहतूक वळविणे आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली. मतमोजणीच्या अनुषंगाने विविध घटकांना कोणताही त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने सर्व ती खबरदारी घेण्याच्या सूचना झा यांनी दिल्या. जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणीसाठी केलेली तयारी व सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.