हजार फूट दरीत सापडला मुंबईच्या ट्रेकरचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 01:26 PM2023-05-19T13:26:55+5:302023-05-19T13:28:14+5:30

कर्जतमधील कातळकड्यावर अडकलेल्या तीन तरुणांची सुटका केल्याची घटना ताजी असताना माथेरानजवळील पेब किल्ल्यावर रविवारी ट्रेकिंगसाठी आलेल्या एका ग्रुपमधील २४ वर्षीय तरुण हरवला होता.

The dead body of a Mumbai trekker was found in a thousand feet valley | हजार फूट दरीत सापडला मुंबईच्या ट्रेकरचा मृतदेह

हजार फूट दरीत सापडला मुंबईच्या ट्रेकरचा मृतदेह

googlenewsNext

नेरळ : कर्जतमधील कातळकड्यावर अडकलेल्या तीन तरुणांची सुटका केल्याची घटना ताजी असताना माथेरानजवळील पेब किल्ल्यावर रविवारी ट्रेकिंगसाठी आलेल्या एका ग्रुपमधील २४ वर्षीय तरुण हरवला होता. त्याचा चार दिवसानंतर १७ मे रोजी हजार फूट खोल दरीत मृतदेह आढळून आला आहे. येथील सह्याद्री रेस्क्यू टीम व आपदा मित्रांनी शोध मोहीम राबवली. निखिल तनीर असे मृत तरुणाचे नाव आहे.

पेब किल्ल्यावर रविवारी ट्रेकिंगसाठी मुंबई येथून १८ जणांचा ग्रुप आला होता. यामध्ये बहुतांश सर्व ज्येष्ठ नागरिक होते. रविवारी दुपारनंतर निखिल अचानक गायब झाला. त्याला संपर्क होत नव्हता. दिवसभर शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. नेरळ पोलिसांनी माथेरान येथील सह्याद्री रेस्क्यू टीम, आपदा मित्र यांना निखिलला शोधण्याची जबाबदारी दिली होती. निखिलचा मृतदेह येथील जवळपास हजार फूट खोल दरीत दुपारी ४ वाजता आढळला. शोध मोहिमेत माथेरान सह्याद्री रेस्क्यू टीमचे वैभव नाईक, सुनील कोळी, सुनील ढोले, चेतन कळंबे, संदीप कोळी, धीरज वालेंद्र, उमेश मोरे, मंगेश उघडे, राहुल चव्हाण, महेश काळे आदी सहभागी झाले.

असा काढला मृतदेह 
हजार फूट दरीत मृतदेह आढळल्यानंतर अंधार पडत आला होता. रात्री ७:३० वाजता मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अंधारामुळे अडचणी समोर होत्या. मध्यरात्री २ वाजता मृतदेह तेथून बाहेर काढत पेब किल्ल्यावर आणला. येथून दोन डोंगर व दरी पार करायची होती. त्यामुळे गडावर असलेली नादुरुस्त ट्रॉली काही सदस्यांनी रात्री दुरुस्त केली. ट्रॉलीच्या साहाय्याने  मृतदेह  नेरळ-माथेरान रेल्वे ट्रॅकवर आणला.
 

Web Title: The dead body of a Mumbai trekker was found in a thousand feet valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.