मागणी वाढली, लागवडही वाढली, पण मजुरी वाढल्याने आंबा बागायदारांना पाडेकरी मिळेना

By निखिल म्हात्रे | Published: May 4, 2024 03:12 PM2024-05-04T15:12:57+5:302024-05-04T15:13:57+5:30

यावर्षीच्या हंगामातील आंबा आता तयार होऊ लागला आहे. मात्र तयार आंबा उतरविण्यासाठी बागायतदारांना अनुभवी पाडेकरी मिळणे कठीण झाले आहे.

The demand increased cultivation also increased but due to the increase in wages, the mango gardeners could not find padekari | मागणी वाढली, लागवडही वाढली, पण मजुरी वाढल्याने आंबा बागायदारांना पाडेकरी मिळेना

मागणी वाढली, लागवडही वाढली, पण मजुरी वाढल्याने आंबा बागायदारांना पाडेकरी मिळेना

अलिबाग - यावर्षीच्या हंगामातील आंबा आता तयार होऊ लागला आहे. मात्र तयार आंबा उतरविण्यासाठी बागायतदारांना अनुभवी पाडेकरी मिळणे कठीण झाले आहे. तयार आंबा खाली उतरविण्यासाठी बागायतदारांना अनुभवी पाडेकऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. सध्या आंबा काढणाऱ्या एका पाडेकऱ्याची एक दिवसाची मजुरी ७०० ते ८०० आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, माणगांव, म्हसळा या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड आहे. रायगड जिल्ह्यात आंब्याचे सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्र असून उत्पादनक्षम क्षेत्र १२ हजार ५०० हेक्टर इतके आहे. कोकणातील हापूस आंब्याला मागणी वाढत असल्याने आता रायगड जिल्ह्यातही आंबा लागवड वाढू लागली आहे. हापूस आंब्यामुळे रायवळ-गावठी आंबे आता मागे पडू लागले आहेत. अनेक बागायतदार आता व्यावसायिक स्वरुपात आंबा उत्पादनाकडे बघू लागले आहेत.

त्यामुळे हापूस आणि चांगला आर्थिक फायदा देणाऱ्या आंबा पिकांची लागवड होत आहे. या वर्षी रायगड जिल्ह्यात हवामान बदलाने आंबा पिकावर परिणाम होईल असे या क्षेत्रातील तज्ञांकडून सांगितले होते. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांनी बागायतींची खबरदारी घेत पिक सावरण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता आंबा बागायती व्यापाऱ्यांना देत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आंबा काढणे, तो पिकविणे, बाजारात वेळीच विकणे यापासून सुटका होते.

सध्या स्थानिक आंबा तयार होत आहे. झाडावर आंबा तयार झाला असल्याने तो खाली उतरविण्यासाठी व्यापाऱ्यांना अनुभवी पाडेकऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. झाडावरील आंबा काढताना तो काढण्यास योग्य आहे का, तो किती दिवसात तयार होईल, फक्त तयार आंबाच काढला जावा, तयार आंब्याबरोबर कच्चे आंबे काढले जावू नयेत, या गोष्टी पाडेकऱ्यांना माहिती असाव्या लागतात. अन्यथा शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होते.

आता झाडावरील आंबा खाली उतरविण्यासाठी अनुभवी पाडेकऱ्यांचा शोध सुरू आहे. सध्या एका पाडेकऱ्याची एक दिवसाची मजुरी ७०० ते ८०० रुपये आहे. एक पाडेकरी एका दिवसात सहा ते सात झाडांवरील आंबा उतरवू शकतो, अशी माहिती एका आंबा व्यापारी निशांत पाटील यांनी दिली.

Web Title: The demand increased cultivation also increased but due to the increase in wages, the mango gardeners could not find padekari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा