कामोठे येथे जमलेल्या मराठा बांधवांचा उत्साह शिगेला; जरांगेंच्या स्वागताला मराठा बांधवांची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 05:19 PM2024-01-25T17:19:32+5:302024-01-25T17:19:46+5:30
मुंबईकडे निघालेला मराठा मोर्चांतील मोर्चेकरांना जेवण देण्यासाठी तीन दिवसांपासून कामोठ्यात लगबस सुरू आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वैभव गायकर पनवेल:पनवेल मध्ये दि.25 रोजी मनोज जरांगे यांच्या स्वागताची जय्यत तयारी मराठा बांधवानी केली आहे.कामोठे येथे पदयात्रींसाठी पाणी,नाष्टयाची तसेच जेवणाचे पॅकेट तयार ठेवण्यात आले आहेत.विशेष म्हणजे जरांगे पाटलांच्या स्वागताला मराठा बांधव मोठ्या संख्येने जमलेले आहेत.
यावेळी ढोल ताशावर मराठा बांधवानी कामोठे येथे ठेका धरला.मुंबईकडे निघालेला मराठा मोर्चांतील मोर्चेकरांना जेवण देण्यासाठी तीन दिवसांपासून कामोठ्यात लगबस सुरू आहे. सायन पनवेल महामार्गांवरून मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चेकरांना कामोठ्यातील मराठा समाज जेवण देवून पाऊणचार करणार आहेत.3 हजार किलोचा मसालेभात आणि 25 हजार चपात्या घराघरातून मोर्चेकरांसाठी गोळा केल्या जाणार आहेत.भाकरी आणि चपाती देण्याचे आवाहन केल्यानंतर महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एका घरातून जास्तित जास्त 15 चपात्या देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार केवळ कामोठ्यातील नव्हे तर परिसरातील अनेक मराठा बांधव जेवण आणून दिले आहे.फक्त भाकरी आणि चपाती नाही तर सोबत चटणी, ठेचा देखील या जेवणासोबत आहे.सकाळी 11 वाजता मनोज जरांगे यांची पदयात्रा पनवेल मध्ये पोहचणार होती.मात्र काही कारणास्तव या सभेला उशीर झाला.तरी देखील मराठा बांधवांचा उत्साह कायम होता.गुरुवारी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी कामोठे याठिकाणी जमलेल्या मराठा बांधवांची भेट घेतली.तसेच करण्यात आलेल्या जेवण व्यवस्थेचा आढावा घेतला.
मोर्चांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेकरांच्या सोईसाठी पनवेल महापालिकेने पनवेल महापालिका क्षेत्रातील सायन पनवेल महामार्गांवर १०० तात्पुरते स्वच्छतागृह ठेवण्यात आले आहे. तर ३०० स्वच्छतागृह वाशी येथे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवण्यात येणार आहेत. अशी माहिती पनवेल महापलिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.