तटकरेंच्या सरकारमधील ‘एन्ट्री’ने राजकारणाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 06:25 AM2023-07-04T06:25:28+5:302023-07-04T06:25:43+5:30

भविष्यात भाजप, शिंदे व सुनील तटकरे विरूद्ध ठाकरे गट, शेकाप, काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

The 'entry' of Tatkare government turned politics upside down | तटकरेंच्या सरकारमधील ‘एन्ट्री’ने राजकारणाला कलाटणी

तटकरेंच्या सरकारमधील ‘एन्ट्री’ने राजकारणाला कलाटणी

googlenewsNext

अलिबाग : वर्षभरापूर्वीच्या शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या वळणावर गेले असताना आता राष्ट्रवादीतही दुफळी निर्माण झाल्याने जिल्ह्यातील राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळाली आहे. खा. सुनील तटकरे यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केल्याची घोषणा राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली तसेच आदिती तटकरे या मंत्रिमंडळात सहभागी झाल्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीला सुरुंग लागला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील तीनही आमदारांची डोकेदुखी वाढली आहे.

भविष्यात भाजप, शिंदे व सुनील तटकरे विरूद्ध ठाकरे गट, शेकाप, काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. सेनेचे तीन आमदार निवडून येऊनही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस विश्वासात घेत नाही, हे कारण देऊन शिवसेना आमदारांनी बंड केले. मात्र, पहिली महिला मंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी शपथ घेतली. गेले वर्षभर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटात नाराजी आहे.   

तटकरेंच्या नेतृत्त्वात काम करणार
आम्ही शरद पवारांना मानणारे कार्यकर्ते असून, जिल्ह्यात सुनील तटकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करीत आहोत. राष्ट्रवादीत फूट वगैरे काहीही पडलेली नसून, हे घरातील भांडण आहे. आम्ही ५ जुलैच्या पक्षाच्या बैठकीला जाणार आहोत, येत्या काही दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. - मधुकर पाटील,  जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अवधूत तटकरे  यांची घरवापसी? 
सुनील तटकरे यांनी भाजप, शिंदे गटासमवेत आघाडी करण्याचे निश्चित झाल्याने सध्या भाजपमध्ये असलेले त्यांचे पुतणे अवधूत तटकरे यांची अडचण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात त्यांची ‘घरवापसी’ होण्याची; तसेच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या सुरेश लाड हे तटकरे बाजूला गेल्याने पुन्हा संघटनेत सक्रिय होण्याची शक्यता आहे.

Web Title: The 'entry' of Tatkare government turned politics upside down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.