शहाळ्यावरील देवीच्या मुखवट्याचे नागाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 05:21 PM2023-10-16T17:21:52+5:302023-10-16T17:24:26+5:30
रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
उरण : दरवर्षी नवरात्रौत्सवात घट स्थापना केली जाते. घट स्थापना करताना बहुतेक ठिकाणी शहाळ्यावर देवीचे मुखवटे सजवून तयार केलेले घट बसविले जातात.असे हे रंगवून सजावट केलेले शेकडो घट उरण तालुक्यातील नागावात तयार केले जातात. त्यामुळे मागील काही वर्षांपासून नागाव हे देवीच्या मुखवट्याचे गाव म्हणून नावारूपास येऊ लागले आहे. रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
नवरात्रौत्सवात घट स्थापना केली जाते.नारळाच्या शहाळ्यावर देवीचे मुखवटे रंगवून,सजवून तयार केलेल्या मुखवट्याच्या घटांना उरण परिसरात मागणी असते.असे हे शहाळ्यावर रंगकाम केलेले देवीच्या मुखवट्याचे तयार करण्याचे काम उरण तालुक्यातील मोठे नागाव येथील राहणारे दिलीप यशवंत पाटील यांचे कुटुंब मागील ४० वर्षापासून करीत आहेत. अनेक ठिकाणी घरगुती अथवा सार्वजनिक मंडळे देवीची मूर्ती सोबत घट किंवा मुर्तीऐवजी शहाळ्यावरील रेखाटलेल्या मुखवट्यालाच अधिक पसंती देतात.
ओल्या शहाळ्याच्या एका बाजूकडील भाग काही प्रमाणात सुरीने कोरुन काढतात. त्याभागावर सुरेख रंगकाम केले जाते.देवीचे आकर्षक डोळे,कान,नाक , मुख तयार केले जाते .त्यावर मंगळसूत्र ,कर्णफुले , नथ असे अलंकार घातले जातात.शहाळ्यावरही देवीचे
डोळे, चेहरा आणि रंगकाम करताना कसब पणाला लावले जाते.त्यातुनच देवीचा आकर्षक मुखवटा आकार घेतो. असे शहाळ्यावरील कलाकुसरीच्या देवीच्या मुखवट्याच्या उरण परिसरात अनेक ठिकाणी खूप मागणी असते.त्यामुळे दरवर्षी शंभरहून अधिक देवीचे शहाळ्यावरील देवीचे मुखवटे तयार केले जातात.शहाळे,रंगकाम, हुबेहूब दिसणारे आकर्षक नकली अलंकार आणि मेहनतीने तयार केलेले शहाळ्यावरील कलाकुसरीचे मुखवटे अगदी नगण्य २०० रुपये दराने विक्री केली जाते.
पारंपारिक वसा जोपासण्याचा हा लहानसा प्रयत्न आहे.यासाठी कुटुंबातील सदस्यांचीही मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळत असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले. नागावातील नाईक कुटुंबही शहाळ्यावरील कलाकुसरीचे मुखवटे तयार करण्यात अगदी माहीर आहे.पारंपारिक परंपरा टिकविण्याची त्यांच्यासह कुटुंबांची धडपड वाखाणण्याजोगी आहे.यासाठी पैसे न घेताही शहाळ्यावरील देवीचे मुखवटे घटासाठी भाविकांना भक्तीच्या भावनेतून दिले जात असल्याचे नाईक कुटुंबाकडून सांगितले जात आहे. यामुळे मात्र मागील काही वर्षांपासून नागाव हे शहाळ्यावरील देवीच्या मुखवट्याचे गाव म्हणून नावारूपास येऊ लागले आहे.