नैनाविरोधात उपोषण सहाव्या दिवशी स्थगित, आंदोलनकर्ते अनिल ढवळे यांची प्रकृती ढासळली

By वैभव गायकर | Published: July 7, 2024 03:58 PM2024-07-07T15:58:46+5:302024-07-07T15:59:36+5:30

मागील सहा दिवसांपासून हे बेमुदत उपोषण सुरु होते. या उपोषणाला 95 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश ठाकुर यांनी पाठिंबा दर्शवला होता.

The hunger strike against Naina adjourned on the sixth day, the agitator Anil Dhavle's condition deteriorated | नैनाविरोधात उपोषण सहाव्या दिवशी स्थगित, आंदोलनकर्ते अनिल ढवळे यांची प्रकृती ढासळली

नैनाविरोधात उपोषण सहाव्या दिवशी स्थगित, आंदोलनकर्ते अनिल ढवळे यांची प्रकृती ढासळली

पनवेल - प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्पग्रस्त मागील दोन वर्षांपासून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. नुकतेच दि.1 रोजी गावठाण विस्तार हक्क समितीचे अध्यक्ष अनिल ढवळे यांनी सीबीडी बेलापुर याठिकाणी रेल्वे स्टेशन टॉवर क्रमांक 10 या नैना प्राधिकरणाच्या कार्यालयाखाली बेमुदत उपोषण छेडले होते.मात्र दि. 6 शनिवारी ढवळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी उपोषणाला स्थगिती दिली.

मागील सहा दिवसांपासून हे बेमुदत उपोषण सुरु होते. या उपोषणाला 95 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश ठाकुर यांनी पाठिंबा दर्शवला होता. नैना प्रकल्प बाधित शेतजमीन मालकांना ४० टक्के विकसित भूखंड आणि त्या भूखंडावर इमारत बांधल्यास विकास शुल्क नैना प्राधिकरणाला भरावे लागणार आहे.प्रत्येक भूखंडाचा विकास करण्यासाठी वास्तुरचनाकार शिवाय नैनाने पर्याय ठेवला नसल्याने बांधकाम परवानगीसाठी टेबलाखालून चौरसफुटामागे लाखो रुपये भरणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. विमानतळ परिसराचा सुनियोजित विकास व्हावा यादृष्टीने हा प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांवर लादला गेला आहे.असे असले तरी या प्रकल्पात स्थानिकांची हित जोपासले गेले नाही.

अन्यायकारक हा प्रकल्प स्थानिकांना देशोधडीला लावणारा असल्याने अनिल ढवळे याविरोधात लढा देत आहेत. एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरु असताना देखील ढवळे यांच्या उपोषणाकडे राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार सुरु असल्याने लोकप्रतिनिधीना स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने कामगार नेते ऍडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी ढवले यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

दरम्यान अनिल ढवळे यांची खालावलेली प्रकृती पाहता सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी देखील ढवळे यांना उपोषण स्थगित करण्यास सांगितल्यावर दि.6 रोजी शनिवारी सायंकाळी ढवळे यांनी उपोषण मागे घेतले. अनिल ढवळे यांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Web Title: The hunger strike against Naina adjourned on the sixth day, the agitator Anil Dhavle's condition deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल