अलिबाग - कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या लाखो चाकरमान्यांना प्रवासात अपघातांचा वा ट्रॅफीक जॅमचा व्यत्यय येऊ नये या करीता वाहतूक पोलिसांनी मागील १० दहा दिवसांपासून कंबर कसली होती. त्यामुळे यावर्षी कोकणवासीयांचा प्रवास विनाअपघात सुखरूप झाला आहे. त्यामुळे सर्वस्तरातून वाहतूक पोलिसांची मात्र कौतुकाने पाठ थोपाटली जात आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम लांबल्यामुळे गेली १२ वर्षे गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास त्रासदायक व वेदना दायक ठरत होता.
पेण - वडखळ हा साधारणत: सात किलोमीटरचा प्रवास नेहमीच चर्चेत होता; परंतु यंदा गणेशोत्सवाकरिता मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा आणि आता परतीचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र तैनात होते, त्यामुळे हा प्रवास सुरळीत झाला. त्यामुळे परतणाऱ्या गणेशभक्तींनी ही पोलिसांचे मनपुर्वक अभिनंदन केले.महामार्गावरील रस्ते दुरुस्तीला पावसाची उघड मिळाल्यामुळे खड्डेमय रस्त्यांचा त्रास झाला नाही. मात्र ऊन आणि रस्त्यांवरील धूळ याची तमा न बाळगता, पोलीस यंत्रणा, पोलीस मित्र आपले कर्तव्य चोख बजावताना दिसत होते.
यामुळेच गणेशोत्सवातील प्रवास सर्व कोकणवासीयांना सुखकर वाटला.यावर्षी गणेश भक्तांची वाट सुखकर करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीला १५० स्वयंसेवक धावून आले होते. गणेशोत्सवादरम्यान होणारी वाहतूक कोंडी असो वा इतर उद्भविणारे प्रश्न असो त्यांचे निराकरण करण्यासाठी हे स्वयंसेवक महामार्गावर काम करीत होते. या स्वयंसेवकांना ओळखण्यासाठी पोलिस विभागामार्फत शिटी, पोलिस मित्र असा लोगो असणारी कॅप व टिशर्ट ही देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना ओळखणे व त्यांनी सांगितलेल्या नियमांचा वाहन चालक पालक करीत असताना ही दिसून येत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल ढेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल लाड तसेच पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी काम केले. गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासातही चांगल्याप्रकारे नियोजन केल्यामुळे या प्रवासात वाहतूककोंडी व अपघातांचे प्रसंग घडले नाहीत. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव आनंदात साजरा झाला, हे ही तितकेच खरे.