कोळी बांधवांनी केला सागराला नारळ आर्पण

By निखिल म्हात्रे | Published: August 30, 2023 07:10 PM2023-08-30T19:10:10+5:302023-08-30T19:10:21+5:30

समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करण्याचा प्रघात आता केवळ औपचारिकतेपुरता उरला आहे.

The Koli brothers offered coconuts to the sea | कोळी बांधवांनी केला सागराला नारळ आर्पण

कोळी बांधवांनी केला सागराला नारळ आर्पण

googlenewsNext

अलिबाग - सण आयलाय गो... आयलाय गो... नारळी पुनवेचा, मनी आनंद मावना... कोळ्यांचे दुनियेचा अशा विविध पारंपारीक कोळी गाण्यांवर नृत्य करीत जिल्ह्यातील कोळी बांधवांनी सागराला नारळ आर्पण केला. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला नारळ अर्पण करून कोळी बांधव होडय़ा सागरात लोटतात. पावसाळ्यात दोन महिने बंद असलेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू करतात. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या सणाला कोळी समुदायात विशेष महत्त्व असते. मात्र पावसाचे संपूर्ण वेळापत्रकच गेल्या काही वर्षांत बदलू लागल्याने पोर्णिमेच्या पूर्वीच मासेमारीसाठी नौका समुद्रात शिरल्या आहेत. त्यामुळे समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करण्याचा प्रघात आता केवळ औपचारिकतेपुरता उरला आहे.

नारळी पौर्णिमेला कोळी समाजामध्ये अत्यंत मानाचे स्थान असून उपजीविकेचे साधन असलेल्या समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण मानला जातो. पावसाळ्याच्या दिवसांत सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला असतो. तसेच हा काळ मत्स्यप्रजननाचाही असतो. खवळलेला समुद्र श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेनंतर शांत होत असतो. त्यामुळे नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करून मासेमारीच्या होडय़ा दर्यात लोटल्या जातात. या परंपरेमुळे तसेच खराब हवामानामुळे पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असते. मात्र पावसाच्या बदलत्या वेळापत्रकामुळे गेल्या काही वर्षांत ही प्रथा कालबाह्य़ होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून जून, जुलैपेक्षाही ऑगस्ट मध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.
यंदाही आतापर्यंत पावसाचे प्रमाण उत्तम आहे. त्यामुळे समुद्रही शांत आहे. परिणामी नारळी पौर्णिमेपूर्वीच मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात प्रवेश केल्याचे दिसून येते. समुद्र शांत असेल त्याच वेळी कोळी बांधव समुद्रात जाऊन मासेमारी करू लागले आहेत.

पौर्णिमेला मात्र जल्लोष

नारळी पौर्णिमेचे व्यावसायिक महत्त्व कमी झाले असले तरी या उत्सवाचा उत्साह अजिबात ओसरलेला नाही. जिल्ह्यांतील कोळीवाडय़ांत आजही नारळी पौर्णिमा दणक्यात साजरी केली जाते. दर्याराजाला पारंपरिक नारळ अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर नारळ फोडण्याच्या स्पर्धेला सुरुवात होते. परिसरातील सुमारे 200 पेक्षा अधिक कोळी कुटूंब त्यात
उपस्थित राहतात, अशी माहिती राजू बानकर यांनी दिली.

नारळ सागराला अर्पण करायाला निघताना मिरवणूकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मिरवणूक तसेच समुद्रात नारळ अर्पण करण्याच्यावेळी योग्य तो पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी बिटमार्शल व दामिनी पथकाचा समावेश होता.

जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर आज कोळी बांधवांनी पारंपारीकतेची कास धरीत नारळी पोर्णिमेनिमित्त नारळ डोक्यावर घेत मिरवणूक काढली होती. त्यानंतर विधीवत पुजा करीत हा नारळ सागराला अर्पण केला. अगदी शिस्तबध्दपणे नियोजन असल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच मिरवणूकी दरम्यान कुठेही ट्रफीक अथवा बाचाबाची होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.

Web Title: The Koli brothers offered coconuts to the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.