भाजपला रोखण्यासाठी डावी आघाडी एकवटली, ‘शेकाप’च्या नेतृत्वाखाली १३ पक्षांची बांधली मोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:24 PM2023-08-03T12:24:42+5:302023-08-03T12:25:23+5:30
शेकापच्या वधार्पन दिनानिमित्त सुधागड येथे बुधवारी झालेल्या मेळाव्यात या आघाडीची घोषणा आ. पाटील व संभाजीराजे यांनी केली.
सुधागड : राज्यातील विविध १३ डाव्या पक्षांनी शेकापचे सरचिटणीस व आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन डावी आघाडी स्थापन केली आहे. त्यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाचाही समावेश असणार आहे. शेकापच्या वधार्पन दिनानिमित्त सुधागड येथे बुधवारी झालेल्या मेळाव्यात या आघाडीची घोषणा आ. पाटील व संभाजीराजे यांनी केली.
भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी त्यांच्या विरोधात देशात इंडिया तर राज्यात सर्व पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी बनवली आहे. त्यांच्याअंतर्गत आमची आघाडी कार्यरत राहील, असे दोघांनी यावेळी जाहीर केले. यावेळी राज्यातील १३ डावे पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भाजप सत्तेत आल्यापासून संविधान विरोधी काम करीत आहे. राज्यात आणि देशात सत्ता काबीज करण्यासाठी भ्रष्ट राजकारण सुरू आहे. महापुरुष यांच्याबाबत अपशब्द वापरूनही भाजप सरकार पाठीशी घालत आहे. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी डाव्या पक्षाने आघाडी बनवली आहे.
‘या’ १३ पक्षांची आघाडी
शेकाप, स्वाभिमानी पक्ष, स्वराज्य पक्ष, आम आदमी पार्टी, सीपीआय, लाल निशाण पक्ष, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे तेरा डावे पक्ष याची आघाडी निर्माण झाली आहे. या आघाडीचे नेतृत्व शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी करावे, असे सर्वच डावे पक्षाने म्हटले आहे.
संभाजी भिडेंवर कारवाई करा : संभाजीराजे
वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. हे सांगलीचे गृहस्थ आमच्या महापुरुषांचा अपमान करत सुटले आहेत. कधी महात्मा फुले तर कधी महात्मा गांधींचा अवमान करतात. सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही?, असा सवाल त्यांनी केला.