भक्ष्याच्या शोधातील बिबट्याच झाला भक्ष्य, रानटी डुकरांसाठी लावला होता फास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 07:28 AM2023-01-20T07:28:00+5:302023-01-20T07:29:01+5:30
रानटी डुकरांसाठी लावलेल्या फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरूड जंजिरा : भालगाव परिसरातील जंगल भागात रानटी डुकरांसाठी लावलेल्या फासात अडकून चार वर्षांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बिबट्याचे वजन ४५ किलो इतके आहे. मंगळवारी सकाळच्या दरम्यान एक बिबट्या फासात अडकल्याची माहिती प्रादेशिक वन विभागास मिळाली. त्यानंतर सर्व वरिष्ठ वनाधिकारी या ठिकाणी पोहचून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील पाचारण करण्यात आले होते. मात्र, सर्व यंत्रणा पोहचेपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला.
भालगाव गावापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या जंगल भागात हा बिबट्या रानटी डुकरांसाठी लावण्यात येणाऱ्या फासात अडकला होता. दुचाकी गाड्यांना वापरण्यात येणारी वायर या फासासाठी वापरण्यात आली होती. फणसाड अभयारण्य परिसरात अनेक बिबटे आहेत. यातील एक बिबट्या भक्ष्य शोधत असताना फासात अडकला. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून, फास लावणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय सांगळे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून आपला अहवाल वनाधिकारी यांना दिला आहे.
वन विभागाला ही माहिती मिळताच बिबट्याला वाचवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पोहचलो होतो. बिबट्या हा चार वर्षांचा होता. भालगाव प्रादेशिक विभागात बिबट्याचा मृत्यू झाला आहे. - मनोज वाघमारे, वन परिक्षेत्र अधिकारी