निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड जिल्ह्यातील तब्बल २४० ग्रामपंचायतींची मुदत या वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत संपणार आहे. मात्र लोकसभा निवडणूक कार्यक्रमामुळे या ठिकाणी निवडणुका झाल्या नसल्याने ग्रामपातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीही केली आहे.
२०२४ या वर्षाचे पहिले सहा महिने लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीने ढवळून निघाले. आता पावसाळा सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत. १ जानेवारीपासून ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यात अलिबाग तालुक्यात ३४, पेण १८, उरण ८, मुरुड ४, कर्जत ३०, खालापूर ३, रोहा २६, तळा १८, म्हसळा ११, सुधागड ६, पनवेल १५, माणगाव २१, महाड ३० आणि श्रीवर्धन १६ अशा १४ तालुक्यांतील एकूण २४० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुकांना मुहूर्त कधी?अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणूक झाली नसल्याने तेथे प्रशासक राजवट लावण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील २४० पैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायतींवर पुढील काळात प्रशासक बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायत निवडणुकांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे गावा-गावांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी आधीपासून सुरुवात केलेली आहे. आता पावसाळ्यात ग्रामपंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या सप्टेंबरअखेर किंवा विधानसभा निवडणुकांनंतरच या निवडणुकांना मुहूर्त लागेल असे सांगितले जात आहे.