घारापुरी बेटाला पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव धरणाने डिसेंबरलाच गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 02:15 PM2023-12-27T14:15:38+5:302023-12-27T14:16:17+5:30
तीन गावे, व्यावसायिक, देशी-विदेशी हजारो पर्यटकांवर पाणी टंचाईचे गंभीर संकट, बोटीने पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्रामपंचायतीची मागणी
मधुकर ठाकूर
उरण : यावर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे घारापुरी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना मे महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव धरणाच्या पाण्याची पातळी डिसेंबर महिन्यातच पुरती खालावली आहे. परिणामी जग प्रसिद्ध घारापुरी बेटावर डिसेंबरपासूनच पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. पर्यटक, बेटवासियांची पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी समुद्रमार्गे इतर ठिकाणाहून बोटीतून पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने राजिप ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर राजबंदर, मोराबंदर,शेतबंदर अशी तीन गावे आहेत. या बेटावरील जगप्रसिध्द कोरीव लेण्या पाहण्यासाठी दररोज हजारो तर वर्षभरात देशी-विदेशी लाखो पर्यटक येतात. पर्यटक आधारित बेटावर स्थानिकांचे कॅन्टीन, रेस्टॉरंट आदी लघुउद्योग आहेत.या सर्वांना पाणी पुरवठा करणारे जुने एकमेव धरण आहे. धरणात साठलेले पाणी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्याला जातो. दरवर्षी पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणात मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असतो. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे धरणात पाणीसाठाही मर्यादित शिल्लक राहिलेला आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत शिल्लक राहणारा पाणीसाठा कमी पावसामुळे डिसेंबर महिन्याअखेरच धरणाच्या पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. जेमतेम पुढील दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना पाणी पुरवठा कसा करावा असा गंभीर प्रश्न आता घारापुरी ग्रामपंचायतीला पडला आहे. घारापुरी हे बेट असल्याने टॅकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही. ग्रामपंचायतीकडेही पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी नाही. बेटावरील पाणी टंचाई दूर करण्यासाठी समुद्रमार्गे बोटीने पाणी पुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बेटावरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी राजिप ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,उरण गटविकास अधिकारी,उरण तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.