पिस्टल विक्रीस आला आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

By राजेश भोस्तेकर | Published: December 22, 2023 05:08 PM2023-12-22T17:08:34+5:302023-12-22T17:08:53+5:30

आरोपींकडून २ देशी पिस्टल व ५ जिवंत काडतूस केली जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची आठवड्यात दुसरी कारवाई.

The pistol was sold and caught in the net of the local crime branch | पिस्टल विक्रीस आला आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

पिस्टल विक्रीस आला आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

 अलिबाग : कर्जत तालुक्यात वाढत असलेले शहरीकरण,औद्योगिकीकरण तसेच मुंबईला लागून असल्याने गुन्हेगारी मध्ये वाढ होतानाचे चित्र निर्माण झाले आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी रायगड पोलीस ही डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. कर्जत चार फाटा येथे देशी पिस्टल विक्रीच्या उद्देशाने आलेल्या सतीश अनिल क्षेत्रे या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. आरोपी सतीश यांच्याकडून २ देशी पिस्टल व ५ जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेली आहेत. कर्जत खालापूर विभागात ही दुसरी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात आलेली आहे. 

आरोपी सतीश अनिल क्षेत्रे वय २९ वर्षे रा. पी. वाय. थोरात मार्ग ,रूम नं.११ चाळ नं.११ टिळक नगर चेंबूर, मूळ राहणार रूम नं. २०१, सद्गुरू मालवणी तडका हॉटेल जवळ ,उलवे,ता.उरण जि.रायगड हा गुरुवारी २१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास कर्जत चार फाटा येथे देशी पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याचे खबर स्थानिक गुन्हे शाखेचे  सफौ राजा पाटील यांना मिळाली होती. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली. 

पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी याची गंभीर दखल घेऊन सहा.पोलीस निरीक्षक नागेश कदम, सफौ राजा पाटील, पोह संदीप पाटील, पोह राकेश म्हात्रे, पोह यशवंत झेमसे असे तपास पथक तयार केले. पथकाने आरोपीला पकडण्यासाठी कर्जत चारफाटा येथे सापळा रचला. आरोपी सतीश हा घटनास्थळी आल्यानंतर पथकाने झडप घालून ताब्यात घेतले. आरोपीची अंग झडती घेतली असता त्याचे जवळ २ देशी पिस्टल व ५ जिवंत काडतूस मिळून आले. आरोपींकडे सापडलेल्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. 

कर्जत पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम २५,३, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५, ३७ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे सदर पिस्टल व काडतूस कोठून व कशासाठी आणले, कोणाला विक्रीस आणले याबाबत सहा.पोलीस निरीक्षक नागेश कदम व पथक तपास  करीत आहे.
 

Web Title: The pistol was sold and caught in the net of the local crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग