आदिवसींच्या ५ एकर जमिनीवर कब्जा करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 11:51 AM2023-07-27T11:51:53+5:302023-07-27T11:51:58+5:30
या प्रकरणी मयत गोपाळ लहान्या कातकरी यांच्या वारसांचा मागील ४० वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष सुरू होता.
मधुकर ठाकूर
उरण - शासकीय यंत्रणेला हाताशी धरून तालुक्यातील दिघोडे येथील एका गरीब आदिवासी कुटुंबाची ४३ वर्षापुर्वी पाच एकर जमीन हडप केलेला प्रयत्न उरण सामाजिक संस्थेने दिलेल्या दोन वर्षे लढ्यानंतर हाणून पाडला आहे.संघटनेच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर याप्रकरणी तिघांना उरण पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे. सत्र न्यायालयाने चौकशी कामी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उरण तालुक्यातील दिघोडे येथील सर्व्हे क्रमांक ९४/८ आणि १००/१ ही पाच एकर जमीन गोपाळ लहान्या कातकरी यांच्या नावे होती. ही जमीन अनेक वर्षांपासून कातकरी कुटुंबांची होती. मात्र १९८० मध्ये गोपाळ लहान्या कातकरी यांच्या मृत्यूनंतर ही जमीन मिळकतीच्या ७/१२ वर वारस नोंद होताना पोश्या, लक्ष्मण आणि पांडुरंग कातकरी आदी वारसांच्या नावे होणे गरजेचे होते. परंतु ही पाच एकर जमीन १९८३ मध्ये दिघोडे येथील तुळशीराम बाबू घरत, लहू बाबू घरत, अंकुश बाबू घरत व भरत बाबू घरत यांच्या नावाने झाली होती. तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्या संगनमतानेच फेरफार क्र. १३८३ नोंदीनुसार गोपाळ लहान्या कातकरी यांचे वारस म्हणून आगरी समाजाच्या व्यक्तीच्या नावे ७/१२ करण्यात आला असल्याची बाब उघडकीस आली होती.
त्यानंतर घरत कुटुंबीयांनी ही पाच एकर जमीन १९९६ मध्ये कैलास सदाशिव सुर्वे यांना नोंदणीकृत खरेदी खताने विक्री केली. कैलास सदाशिव सुर्वे यांनी त्या जागेचा कब्जा घेवून जागेवर कुंपण घालून कंटेनर यार्डचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र रायगड जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी न घेता सुर्वे यांनी तत्कालीन तहसिलदार कल्पना गोडे यांच्या संगनमताने ही जमीन बिनशेती केली असल्याचे उघडकीस आले होते. आदिवासी खातेदारांची जमीन कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करायचे असल्यास शासनाची पूर्व परवानगी आवश्यक असते. जमीन हस्तांतरण करताना मात्र कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आणि नियमबाह्य पद्धतीने घिसाडघाईने करण्यात आली असल्याचेही निदर्शनास आले होते.
या प्रकरणी मयत गोपाळ लहान्या कातकरी यांच्या वारसांचा मागील ४० वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष सुरू होता.त्यानंतर नातं मुक्ता अनंता कातकरी यांनी उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी यांच्या सहकार्याने मागील तीन वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष सुरू केला होता.उप विभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात फेरफार पुनर्विलोकन अपील दाखल केले होते. त्यावर उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी फेरफार चुकीचा असल्याचा निर्णय दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून न्यायाची याचना केली होती.त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन झालेल्या अन्यायाची व्यथा मांडून न्याय मिळवून देण्याची विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.अशी माहिती उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी सरचिटणीस संतोष पवार यांनी दिली.
तक्रारींची दखल घेऊन न्हावा -शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी उरण पोलिसांना गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले होते.उरण पोलिसांनीही तुळशीराम बाबू घरत, भरत बाबू घरत, अंकुश बाबू घरत यांना अटक केली आहे.दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर चौकशीत सत्य उघडकीस येईल असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.