एसटीच्या सवलतीने खाजगी प्रवासी वाहतूक व्यवसायावर कुऱ्हाड

By निखिल म्हात्रे | Published: March 1, 2024 04:56 PM2024-03-01T16:56:32+5:302024-03-01T16:56:42+5:30

खाजगी प्रवासी वाहतुकीला चालना मिळाल्याने व्यवसायाचे नवीन साधन निर्माण झाले.

The private passenger transport business has suffered losses due to concession of ST | एसटीच्या सवलतीने खाजगी प्रवासी वाहतूक व्यवसायावर कुऱ्हाड

एसटीच्या सवलतीने खाजगी प्रवासी वाहतूक व्यवसायावर कुऱ्हाड

अलिबाग - महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत लागू केल्याने एस टी च्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. सवलतीच्या दरात प्रवास करायला मिळत असल्याने महिला वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी याचा खाजगी प्रवासी वाहतूक दारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करायचा असा प्रश्न  त्यांना पडला आहे.

एस टी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवन वाहिनी समजली जाते. काही वर्षा पूर्वी पर्यंत ग्रामीण जनतेसाठी एस टी हे एकमेव प्रवासाचे साधन होते. दुर्गम डोंगराळ भागात जिथं जिथं रस्ता पोहोचला तिथं तिथं एस टी ची प्रवासी वाहतूक सुरू झाली आणि ग्रामीण जनतेची पायपीट थांबली. पुढे खाजगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आणि एस टी ची प्रवासी संख्या घटली. त्याचा एस टीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. एस टीच्या फेऱ्या मर्यादित असल्याने ग्रामीण प्रवाशांची पावले रिक्षा, मिनीडोअर सारख्या खाजगी वाहनाकडे वळली. आणि एस टी चा प्रवास तोट्याच्या दिशेने सुरू झाला.

खाजगी प्रवासी वाहतुकीला चालना मिळाल्याने व्यवसायाचे नवीन साधन निर्माण झाले. ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन आणि सहा आसनी वाहनांची संख्या वाढली. अनेकांनी कर्ज काढून या व्यवसायात उडी घेतली. किमान कुटुंबाचे गुजराण करता येईल इतकी कमाई या व्यवसायातून होत होती. कोरोना सारख्या जागतिक महामारीचा फटका रिक्षा, मिनीडोअर  चालकांना बसला. लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आणि हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. यात अनेक वाहतूक दारानी कर्ज काढून गाड्या घेतल्या होत्या कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले. शासनाकडून देखील कुठलीच मदत किंवा सवलत मिळाली नाही त्यामुळे या व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले.

कोरोना महामारीची साथ संपल्यानंतर हा व्यवसाय हळूहळू पूर्व पदावर आला असतानाच या व्यवसायावर नवीन आपत्ती येवून कोसळली. राज्य सरकारने महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना एस टी च्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत जाहीर केली. त्याचा विपरीत परिणाम रिक्षा मिनीडोअर व्यवसायावर झाला. एस टी च्या लाल परीला महिलांची पसंती मिळू लागली. रिक्षा मिनी डोअर कडील ओढा कमी झाला. प्रवासी संख्या घटल्याने त्यांचा व्यवसाय डबघाईला आला. अनेकांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या होत्या त्यांना कर्जाचे हप्ते फेडणे जड जाऊ लागले आहे. त्यातच डिझेलच्या दरात झालेली वाढ त्रासदायक ठरते आहे. दरवाढीमुळे प्रवासी भाड्यात वाढ करणे अपरिहार्य झाले असून प्रवाशांचा ओढा एस टी कडे वाढतो आहे. अशा स्थितीत व्यवसाय कसा सुरू ठेवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

राज्‍य सरकारने एसटी प्रवास भाडयात महिलांना ५० टक्‍के सवलत दिली आहे. त्‍यामुळे रायगडच्‍या महिलांना लालपरी अधिक लाडकी झाली आहे. रायगड जिल्‍हयात एसटीने प्रवास करणारया महिलांच्‍या संख्‍येत जवळपास ५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. मागील साडेचार महिन्यात जिल्‍हयात  ७९ लाख ६ हजार ९२ इतक्या महिला प्रवाशांनी  या सवलत योजनेचा लाभ घेत प्रवास केला आहे.

मी बँकेचे कर्ज काढून मिनीडोअर घेतली. सुरुवातीला व्यवसाय चांगला चालत होता. परंतु महिलांना एस टी प्रवासात सवलत दिल्या पासून आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेकदा डिझेलचे पैसेदेखील निघत नाहीत. बँकेचे हप्ते फेडताना नाकीनऊ येत आहेत.
- प्रणव दळवी, मिनीडोअर चालक

Web Title: The private passenger transport business has suffered losses due to concession of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग