कंपनीचे उत्पादन बंद होते, प्लांटमध्ये ड्रम आले कुठून?, ‘ब्ल्यू जेट हेल्थकेअर’ची चौकशी होणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 11:24 AM2023-11-11T11:24:52+5:302023-11-11T11:26:13+5:30
अपघातानंतर कारखान्याच्या कामगारांच्या सुरक्षेबाबत, कारखान्याच्या परवान्याबाबत, होत असलेल्या उत्पादनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महाड : महाड एमआयडीसीमधील ‘ब्लू जेट हेल्थकेअर’ कंपनीमध्ये ३ नोव्हेंबर रोजी आग लागून झालेल्या अपघातात ११ कामगारांचा मृत्यू झाला होता. या कामगारांच्या अपघाताला जबाबदार कोण, याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याठिकाणी असलेली जुनी कंपनी ‘ब्लू जेट हेल्थकेअर’ व्यवस्थापनाने घेतली होती, यामुळे कंपनीचे उत्पादनदेखील सुरू नव्हते. मग ज्या प्लांटमध्ये अपघात झाला. त्या प्लांटमध्ये रसायनाने भरलेले ड्रम आले कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अपघातानंतर कारखान्याच्या कामगारांच्या सुरक्षेबाबत, कारखान्याच्या परवान्याबाबत, होत असलेल्या उत्पादनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवर चौकशी समिती स्थापन केली आहे. मात्र, ज्यांच्या हातात कंपन्यांचे नियंत्रण आहे त्यांच्याकडेच चौकशी करण्याचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या समितीकडून सखोल चौकशी केली जाईल का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे.
काय काम सुरू होते?
ज्या कंपनीत अपघात झाला त्या कंपनीचे पूर्वीचे नाव अंजनिया आणि डॉ. डॅटसन असे होते. या कंपन्या बंद पडल्यानंतर कंपनीचा प्लांट ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीने घेतला. एकरभर परिसरात मूळ प्लांटच्या सभोवती काँक्रीटच्या इमारतीचे काम सुरू आहे. कंपनीची इमारती उभ्या राहत असताना जुन्या प्लांटमध्ये नक्की काय काम सुरू होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोणत्या उत्पादनास परवानगी होती?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अपघात झाल्यानंतर सदर कंपनीला दिलेली कन्सेंट काय होती, हे तपासण्यास सुरुवात केली. सदर कंपनीमध्ये ‘क्यूनीन सल्फेट’ या उत्पादनाला परवानगी दिली होती. मात्र, कंपनीमधील जुन्या प्लांटमध्ये हेच उत्पादन सुरू होते का, याचे उत्तर कंपनीमध्ये आग लागल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या ड्रम्सची तपासणी केल्यावरच निष्पन्न होणार आहे.