पाऊस, तुडतुड्याने मोहोर खाल्ला; आंबा बागायतदारांची झोप उडाली! अवकाळीमुळे आंबा पीक अडचणीत
By निखिल म्हात्रे | Published: March 8, 2024 11:16 AM2024-03-08T11:16:46+5:302024-03-08T11:17:19+5:30
आंबा उत्पादनावर परिणाम होऊन तुडतुड्या, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे.
अलिबाग : जिल्ह्यातील अनेक भागांत मागील शुक्रवारी सकाळी अवकाळी पाऊस कोसळला होता. या पावसामुळे आंब्याचा फुललेला मोहर काळा पडण्याची शक्यता आहे. त्याचा आंबा उत्पादनावर परिणाम होऊन तुडतुड्या, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे १४ हजार हेक्टर आंबा लागवडीचे क्षेत्र आहे. त्यात आंबा उत्पादनाचे साडेबारा हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत. या उत्पादनातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे. रायगड जिल्ह्यातील काही आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच वाशी मार्केटमध्ये तयार आंबा विक्रीस नेला असला तरी बहुतांश बागायतदारांच्या बागेतील कलमे अद्याप मोहरत आहेत.
मोहर टिकवण्यासाठी त्यावर करावी लागणारी औषध फवारणी व अन्य उपाययोजना करूनही फलधारणा कशी होते, याकडे बागायतदारांचे लक्ष लागले असताना, पुन्हा एकदा पडलेल्या अवकाळीमुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, यावर्षी उत्पादन लांबणीवर पडणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात घट होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे.
काही बागांमध्ये आंब्याला मोहर येत आहे, तर काही ठिकाणी कैरी तयार होण्याबरोबरच आंबेदेखील तयार झाले आहेत; परंतु आठवड्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे तुडतुड्या, बुरशीजन्य रोग येण्याची भीती आहे. त्यामुळे दहा टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
- चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ
अवकाळी पाऊस फारच कमी पडला आहे. त्यामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होणार नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी आलेले मोहर गळून पडेल; परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.
- उज्ज्वला बाणखेले, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी