रायगडची जागा लढविण्याचा अधिकार सुनील तटकरेंचाच, शिंदेंच्या आमदाराचे स्पष्टीकरण
By राजेश भोस्तेकर | Published: February 12, 2024 12:54 PM2024-02-12T12:54:13+5:302024-02-12T12:55:42+5:30
अलिबाग शहरातील एका कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.
अलिबाग : रायगडलोकसभा मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या जागेवरून कलगी तुरा सुरू झाला आहे. भाजपचे रायगडचे नेते वारंवार रायगड लोकसभा जागेसाठी मेळाव्यातून दावा करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे पुन्हा लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनीही रायगड लोकसभासाठी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना पसंती दिली आहे. भाजपने याबाबत आत्मपरीक्षण करावे आज लोकसभेसाठी दावा करीत आहेत. उद्या विधानसभेसाठी ही दावा करतील. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. अशी प्रतिक्रिया अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे.
अलिबाग शहरातील एका कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. त्यावेळी रायगड लोकसभा जागेबाबत शिंदे गटाची भूमिका काय याबाबत प्रश्न विचारला असता आमदार दळवी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आमदार दळवी यांच्या या वक्तव्यमुळे शिंदे गटाने लोकसभेचा दावा सोडला असल्याचे यावरून दिसत आहे. शिंदे गट आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याचे यावरून दिसत आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपने हा पहिल्यापासून या मतदार संघांवर दावा करीत आहे. सध्या जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील याचे मतदार संघात जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. अद्यापही रायगडाची जागा युतीमध्ये कोणाला देणार यात चर्चा झालेली नाही आहे. मात्र भाजप तर्फे ही जागा आपल्यालाच मिळणार अशा आविर्भावात नेत्याची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. युतीचे मित्र असलेले विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना ही सभेतून विरोध केला जात आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच लोकसभा जागेवरून वाद निर्माण झाला आहे.
रायगड लोकसभा लढविण्यासाठी खासदार सुनील तटकरे हेच हकदार असल्याचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे. लोकसभेवेळी जर अशी परिस्थिती असेल तर विधानसभेलाही चर्चा होईल यामुळे युतीत दुरावा निर्माण होईल त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होणे आवश्यक आहे. असे मत आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले अनंत गीते यांनी कोणतीही विकास कामे केलेली नाही आहे. कधी निधीही आणलेला नाही आहे. उलट सुनील तटकरे यांच्या कामाचा धडाका जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे गीते हे उमेदवार असतील तर काहीही फरक पडणार नाही असे दळवी यांनी म्हटले आहे.