मुलांच्या विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : डॉ. नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 10:15 AM2023-01-07T10:15:49+5:302023-01-07T10:17:12+5:30
उरण एज्युकेशन सोसायटीच्या विशेष निमंत्रणावरून या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
मधुकर ठाकूर
उरण : मुलांनी आई-वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शिक्षणात यश मिळवावे. प्रत्येक विद्यार्थी हा यशाचा मार्ग चोखाळू शकतो. मात्र पालकांनी देखील सुजाण पालकत्वाच्या भूमिकेतून मुलांना अधिक मार्क्स मिळविण्यासाठी दबाव आणता कामा नये. आपल्या पाल्यांना मोकळ्या वातावरणात शिक्षण घेऊ द्या, बागडू द्या. मुलांना त्यांची स्वतःची स्पेस निर्माण करू द्या त्यातूनच त्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल. अर्थात मुलांच्या सर्वांगीण विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन शुक्रवारी (६) विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी उरण येथे केले. येथील उरण एज्युकेशन सोसायटीच्या विशेष निमंत्रणावरून या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, 'प्रत्येक मूल हे सुंदर असते, त्यात एक यशस्वी व्यक्ती दडलेली असते. त्यावर योग्य संस्कार केले की ती आकारास येते. प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये सेफ कॅम्पस योजना राबविण्यात यावी याबाबत मी आग्रही आहे. जेणेकरून रॅगिंग किंवा बुलिंग सारख्या प्रकारांवर प्रभावीपणे नियंत्रण आणता येईल. तसेच विद्यार्थिनींना काही तक्रारी असतील तर त्याबाबत त्यांना शाळा व्यवस्थापनाकडे संपर्क साधता येईल.' यावेळी सर्व पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांनी हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. उरण एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांच्या १०० टक्के निकलाच्या परंपरेचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. रायगड जिल्ह्याच्या एका भागात अनेक वर्षांपासून कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय ही संस्था उत्तम काम करीत असल्याबद्दल सर्व विश्वस्त मंडळाचे अभिनंदन केले.
यावेळी या संस्थेचे अध्यक्ष तन्सुख जैन आणि सचिव आनंद भिंगार्डे हे उपस्थित होते. याचसोबत डॉ. संजय व डॉ. श्रुती काळकेकर दाम्पत्य, पत्रकार संजय जोग, विश्वस्त मंडळाचे इतर सदस्य, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उपजिल्हा संघटिका ॲड.सौ.ममता पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख सौ. ज्योती म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.