फुलांच्या सुगंधाला महागाईच्या झळा; मोगरा, निशिगंधाच्या दरात ५० ते १०० रुपयांत वाढ
By निखिल म्हात्रे | Published: April 26, 2024 02:35 PM2024-04-26T14:35:50+5:302024-04-26T14:36:34+5:30
फूल बाजारपेठेत नांदेड, मुदखेड, पुणे, परतूर आदी भागातून विविध फुले विक्रीसाठी दाखल होतात.
अलिबाग : शाळांना सुटी आणि विवाहाचे मुहूर्त असल्याने ठिकठिकाणी मुंजीपासून विवाह सोहळ्यांची धूम आहे. त्याचा परिणाम फुलांच्या दरावर झाला असून, मोगऱ्यापासून गुलाबापर्यंतच्या फुलांचे दर ५० ते १०० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
फूल बाजारपेठेत नांदेड, मुदखेड, पुणे, परतूर आदी भागातून विविध फुले विक्रीसाठी दाखल होतात. या महिन्यामध्ये लग्न सोहळ्यासाठी फुलांना आणि हारांना सर्वाधिक मागणी आहे. यामध्ये मोगरा, जरबेरा गुलाब, निशिगंधा या फुलांचा सर्वाधिक वापर केला जातो. मागील काही दिवसांमध्ये वाढलेल्या उन्हामुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. मात्र, समारंभांमुळे मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे.
वाहनाची सजावटही महागली -
लग्न सोहळ्यानिमित्त नवरदेवाच्या वरातीसाठी, लग्न परतणीसाठी वापरले जाणारे वाहन, कार, जीप विविध फुलांनी सजविले जाते. या वाहनाची सजावट करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. ही सजावट ही पूर्वीपेक्षा महागल्याचा फटका लग्नसराईमध्ये वधू - वराच्या कुटुंबाला सहन करावा लागत आहे.
विविध फुलांच्या दरांचा आढावा (किलो, रुपयांत)
फुलाचा प्रकार आताचे दर गेल्या आठवड्यातील दर
मोगरा - ५००-६०० ४५०
जरबेरा - १२० १००
गुलाब १५० ते २०० १३०
निशिगंधा - ५०० ४५०
लग्नसराईमुळे प्रत्येक फुलांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे लग्नातील जोडीसाठीचे हार तसेच गजरा आणि गुलाबाच्या फुलांचे दरही वाढले आहेत.
- प्रशांत पाटील, फुलहार विक्रेते