आगरदांडा - मुरूड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याजवळच्या जेट्टीच्या कामाला सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा मुहूर्त मिळाला असून, कामालाही वेग आला आहे. त्यामुळे १ एप्रिलला ती चाचणीसाठी खुली होण्याची शक्यता वर्तविली आहे.
समुद्रातील जंजिरा किल्ल्यात शिडाच्या होडीतून उतरताना पर्यटकांना लाटांच्या तडाख्यामुळे मोठी कसरत करावी लागते. काही पर्यटक तर उतरताना गंभीर जखमी झाले आहेत. याची दखल घेत शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत किल्ल्याच्या पश्चिमेकडे जेट्टी बनवण्यासाठी ९३ कोटी ५६ लाख रुपये निधीला पुरातत्त्व विभागाने मंजुरी दिली होती. हे काम प्रगतिपथावर असताना गेल्या सहा महिन्यांपासून थांबल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परंतु, आता पुन्हा कामाला सुरुवात झाली असून, हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण होऊन १ एप्रिल रोजी चाचणीसाठी जेट्टी खुली होणार असल्याने पर्यटकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
...तर नियमित प्रवासी वाहतूक सुरू होईल महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, मुंबईचे उपअभियंता दीपक पवार यांनी सांगितले की, किल्ल्याजवळील जेट्टीचे काम पावसामुळे बंद होते. जेट्टीसंदर्भातील कास्टिंग काम दिघीजवळील पेट्रोलपंपाजवळ सुरू आहे. काम पूर्ण झाल्याने जेट्टीच्या कामाला सुरुवात केली आहे. हे काम ३१ मार्चपूर्वी होणार आहे. १ एप्रिलपासून शिडाच्या होड्या व इंजीन बोटीची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर येथून प्रवासी वाहतूक सुरू होईल.