आरोग्यदायी ताडगोळ्यांचा गोडवा यंदा महागला; १०० रुपयाला केवळ ८ ताडगोळे
By निखिल म्हात्रे | Published: June 8, 2024 08:44 PM2024-06-08T20:44:48+5:302024-06-08T20:45:03+5:30
जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड आदी तालुक्यात ताडगोळ्यांचे मुबलक उत्पादन होते. येथून काही महिला विक्रेत्या किंवा विक्रेते जिल्ह्यात इतरत्र ताडगोळे विक्रीसाठी जातात.
अलिबाग : सध्या ताडगोळे काही प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागले आहेत. मात्र गेल्यावर्षी या १०० रुपयांना एक डझन मिळणारे ताडगोळे यंदा १०० रुपयांना अवघे ८ किंवा ९ मिळत आहेत. ताडगोळ्यांचा हंगाम सुरू होण्यास अजून अवकाश आहे. उत्पादन कमी आहे. त्यामुळे किमती वाढल्या आहेत. तरीदेखील हंगामात पहिल्यांदा आलेले ताडगोळे खवय्ये आवर्जून खात आहेत.
जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड आदी तालुक्यात ताडगोळ्यांचे मुबलक उत्पादन होते. येथून काही महिला विक्रेत्या किंवा विक्रेते जिल्ह्यात इतरत्र ताडगोळे विक्रीसाठी जातात. तर काही जण छोट्या टेम्पोत ताडगोळे घेऊन विविध बाजारात जातात किंवा महामार्गाच्या कडेला विक्रीसाठी बसतात. ग्राहक आल्यावर त्यास आवरण काढून ताजे ताडगोळे काढून दिले जातात.
ताडगोळे हे हंगामी फळ आहे. उन्हाच्या काहिलीपासून दूर राहण्यासाठी थंडगार व मधुर ताडगोळे खायला सर्वांना आवडतात. शरीराला थंडावा देण्यासाठी बहुतांश लोक ताडगोळे खरेदी करत आहेत. ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह, झिंक, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम असे अनेक गुणधर्म असतात.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यापासून उपयुक्त. मधुमेही व हृदय विकार असलेली माणसेदेखील ताडगोळे खाऊ शकतात. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहिल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकले जातात. ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. पोटात गॅस होणे, अपचन, पोटदुखी, जळजळ, बद्धकोष्ठता, मूळव्याध असे त्रास यामुळे कमी होतात. ताडगोळे खाण्यामुळे त्वचेला पुरेसे पोषण मिळते. शारीरिक थकवा कमी होतो. शरीराला योग्य उर्जेचा पुरवठा होतो. आदी अनेक फायदे ताडगोळे खाण्याने होतात.
उत्पादन कमी तसेच हंगाम सुरू होण्यास अवधी असल्याने यावर्षी ताडगोळ्याची किंमत वाढली आहे. छोटा पिकअप टेम्पो घेऊन महामार्गाच्या कडेला ताडगोळ्यांचा विक्री करतो. लोक आवर्जून खरेदी करतात. - मधुकर पाटील, ताडगोळे विक्रेता.