कोर्टाने तीस झाडे लावण्याची शिक्षा दिली चोरट्याला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 06:48 AM2023-04-26T06:48:37+5:302023-04-26T06:48:57+5:30
अलिबाग तालुक्यातील आरोपी हा चोरी प्रकरणात अटक झाला होता
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : एखाद्या गुन्ह्यात आरोपीला गुन्ह्यानुसार न्यायालय शिक्षा सुनावते. दोन वर्षे, सात वर्षे तर काही गंभीर गुन्ह्यात मृत्युदंडाची शिक्षाही सुनावली जाते. काहीवेळा न्यायालयात बसण्याची किंवा स्वच्छता करण्याची शिक्षाही आरोपीला देण्यात आलेली आहे. अलिबाग न्यायालयातही अशीच एक अनोखी शिक्षा चोरीतील आरोपीला देण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला वनविभागाच्या क्षेत्रात ३० झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने शिक्षा पूर्ण केली आहे.
अलिबाग तालुक्यातील आरोपी हा चोरी प्रकरणात अटक झाला होता. आक्षी गावात कोळी वाड्यातून आरोपीने एलईडीची चोरी केली होती. पोलिस हवालदार रूपेश निगडे हे आपले सहकारी राजेश ठाकूर यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत होते. संशयित म्हणून आरोपीला निगडे यांनी ताब्यात घेतले होते.
वकिलाचा युक्तिवाद
पोलिसांनी तपास पूर्ण करून अलिबाग न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या समोर सुरू होते. सरकार पक्षातर्फे वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. न्यायालयाने वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवून वनविभागाच्या अधिकारात येणाऱ्या जागेत ३० झाडांची लागवड करण्याची शिक्षा सुनावल्याची माहिती तपासिक अधिकारी हवालदार रूपेश निगडे यांनी दिली.