दुचाकीला एलईडी बल्ब लावण्याचा ट्रेंड वाढतोय, अपघाताची भीती
By निखिल म्हात्रे | Published: November 29, 2023 04:50 PM2023-11-29T16:50:02+5:302023-11-29T16:50:19+5:30
तीनशे रुपयांपासून दीड हजारपर्यंत खर्च करून एलईडी बल्ब लावला जात आहे.
अलिबाग - एलईडी बल्बचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या बल्बचा पादचाऱ्यांसह अन्य वाहन चालकांच्या डोळ्याला त्रास होऊन अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रस्त्यांवरील खड्डे, गतिरोधकांवरील पांढऱ्या पट्ट्यांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे दुचाकीस्वारांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातून पर्यायी मार्ग म्हणून प्रखर उजेडासाठी दुचाकीला एलईडी बल्ब लावण्याचा प्रकार वाढला आहे. काही जण रात्रीच्यावेळी रस्ता ठळकपणे दिसावा तर काही जण हौस म्हणून एलईडी बल्ब दुचाकीला लावत आहेत. तीनशे रुपयांपासून दीड हजारपर्यंत खर्च करून एलईडी बल्ब लावला जात आहे.
जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर एलईडी बल्बची दुकाने थाटली आहेत. मात्र रात्रीच्यावेळी प्रवास करणारे पादचारी, प्रवासी, सायकलस्वार व अन्य वाहनचालकांना या एलईडी बल्बचा त्रास होत असल्याच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. प्रखर उजेडामुळे डोळे दिपले जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन व जिल्हा वाहतूक शाखेकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. तसेच वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे. मात्र एलईडी बल्ब लावणाऱ्यांवर कारवाई करताना दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
हौस म्हणून प्रखर उजेडासाठी दुचाकीला एलईडी बल्ब लावणे बेकायदेशीर आहे. ज्या दुचाकीला कंपनीचे बल्ब लावले आहे. त्याच नियमात राहून बल्ब लावणे आवश्यक आहे. गैरप्रकार कोणीही करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याबाबत अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या जातील.
- महेश देवकाते , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण.
एलईडी बल्बला प्रखर उजेड आहे. या उजेडाचा त्रास डोळ्यांच्या बुवळ्यांना होऊन डोळे दिपण्याचे प्रकार वाढत आहेत. काही क्षण डोळ्यांवर अंधार पसरतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डॉ. विजय जाधव, नेत्ररोग तज्ञ