उद्ध्वस्त झालेल्या इर्शाळवाडी पुनर्वसनाची प्रतीक्षा संपता संपेना; घरांच्या वाटपाची प्रक्रियाही रखडली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 11:21 AM2024-08-15T11:21:42+5:302024-08-15T11:26:51+5:30
विविध कारणांमुळे स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकला, आपदग्रस्त हवालदिल
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या इर्शाळवाडीतील आपदग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प सिडकोने निर्धारित वेळेत पूर्ण केला. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात जाण्याची अपेक्षा होती. मात्र, विविध कारणांमुळे घरांच्या वाटपाची प्रक्रिया रखडल्याने स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकल्याने आपदग्रस्त हवालदिल झाले आहेत.
गेल्या वर्षी २७ जुलै रोजी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊन इर्शाळवाडीतील ४४ कुटुंबे बेघर झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दरडग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे निर्देेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलेल्या २.६ हेक्टर जागेवर राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार सिडकोने पुनर्वसन प्रकल्प उभारला आहे. सध्या हे काम पूर्ण झाले असून, स्वातंत्र्यदिनी आपदग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या घरांचे वाटप होईल, असे अडाखे बांधले जात होते.
३० कोटींचा खर्च
प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, उद्यान, खेळाचे मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पाणी, वीज आणि रस्ते आदी सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या प्रकल्पावर सिडकोने तीस कोटींपेक्षा अधिक खर्च केला आहे.
३०० चौरस मीटरची घरे
नानिवली गावातील २.६ हेक्टर जागेवर इर्शाळवाडी आपदग्रस्तांसाठी पुनर्वसन प्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी आपदग्रस्तांसाठी ४४ घरे बांधली जात आहेत. आपदग्रस्तांसाठी प्रत्येकी ३०० चौरस मीटर क्षेत्रफळावर ४४ घरे बांधली आहेत. ही जागा काही प्रमाणात जमिनीपासून उंचावर आहे. असे असले तरी भविष्यातील धोका टाळण्यासाठी जागेच्या बाजूस आरसीसी संरक्षक भिंत बांधली आहे.