जेएनपीए-मुंबई स्पीड बोटीची प्रतीक्षा कायम; सेवा सुरू झाल्यावर प्रवास किती वेळात होणार? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:23 IST2025-04-08T13:19:11+5:302025-04-08T13:23:41+5:30
दूषणविरहीत स्पीडबोटीमुळे प्रवाशांना फक्त जेएनपीए-मुंबईदरम्यान ३५ ते ४० मिनिटांत पोहोचता येणार आहे.

जेएनपीए-मुंबई स्पीड बोटीची प्रतीक्षा कायम; सेवा सुरू झाल्यावर प्रवास किती वेळात होणार? जाणून घ्या...
लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : बहुचर्चित जेएनपीए ते गेटवेपर्यंतची सागरी प्रवासी स्पीड बोटसेवा सुरू करण्यास माझगाव डॉक कंपनीकडून तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे आणखी २०-२२ दिवसांचा कालावधी लागणार आहे. एप्रिल शेवटचा आठवडा अथवा मे महिन्यात प्रवासी वाहतूकसेवेसाठी वाट पाहावी लागणार असल्याची माहिती जेएनपीए प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली.
जेएनपीएने लाकडी प्रवासी बोटींना प्रदूषणविरहीत इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीडबोटींचा पर्याय निवडला आहे. प्रदूषणविरहीत स्पीडबोटीमुळे प्रवाशांना फक्त जेएनपीए - मुंबईदरम्यान ३५ ते ४० मिनिटांत पोहोचता येणार आहे.
स्पीडबोटींचे महिनाभरापूर्वी प्रात्यक्षिक
जेएनपीए ते गेटवे ऑफ इंडिया या सुमारे १० किमी सागरी अंतरापर्यंत दोन बोटींची स्पीडबोट सेवा १० वर्षांपर्यंत पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी माझगाव डॉक कंपनीवर सोपविण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२५पर्यंत ही स्पीडबोट प्रवासी सेवा सुरू करण्याचा इरादा जेएनपीएने जाहीर केला होता. त्यानंतर माझगाव डॉक कंपनीकडून स्पीडबोटींचे महिनाभरापूर्वी प्रात्यक्षिकही घेतले होते. मात्र, स्पीडबोट ना वेगावर ना वाहतूकीवर खरी उतरली.