अलिबाग - रायगड जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत थेट सरपंचपदी निवडून आलेल्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि.१७) सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. तसेच यावेळी उपसरपंच निवडणूकही घेण्यात आली. ठिकठिकाणी जल्लोषात कार्यकर्त्यांनी नवनियुक्त सरपंच व उपसरपंचांचे स्वागत केले.
रायगड जिल्ह्यात ५ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडली. आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडल्याने ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाच्या झेंडा फडकावा यसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली होती.
ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती मधील घटकफक्ष असणाऱ्या शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप या पक्षांचे १३४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले होते. तर इंडिया आघाडी मधील घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शेतकरी कामगार पक्ष या पक्षांचे ५८ सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले.
ग्रामविकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवारांनी १२ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळविला होता. नवनियुक्त सरपंचांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. यावेळी ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच पदासाठी निवडणूक घेऊन उपसरपंच निवड करण्यात आली.
तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या निवडणूकीमध्ये सुरेंद्र नागलेकर यांचा एकमेव अर्ज उपसरपंच पदासाठी दाखल झाल्याने त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे नवनिर्वाचित सरपंच हर्षदा म्हात्रे, मयेकर यांनी जाहिर केले. नागाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रीया ग्रामविकास अधिकारी श्वेता कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी सदस्य निखिल मयेकर, मिना म्हात्रे, लीना भगत, मंगला नागे, आदेश मोरे, रोहीणी म्हात्रे, अनिरुध्द राणे, विणा पिंपळे, प्रियांका काठे, निकीता पाडेकर, रोहन नाईक, परेश ठाकूर, अंकीता शेवडे, सुरज म्हात्रे, माजी सरपंच नंदकुमाकर मयेकर, निता मयेकर, राजेंद्र मयेकर, सुनिल म्हात्रे, अंजली म्हात्रे, राजरी म्हात्रे, पोलीस पाटील संजय पाटील, ग्रामस्थ, महिला, कोतवाल व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.