जिल्ह्यातील महिलांचे सर्वच क्षेत्रातील काम कौतुकास्पद : पालकमंत्री उदय सामंत
By निखिल म्हात्रे | Published: October 26, 2023 01:50 PM2023-10-26T13:50:49+5:302023-10-26T13:51:02+5:30
मंत्री अदिती तटकरे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 18 नवदुर्गांचा सन्मान
अलिबाग -जिल्ह्यातील महिलांचे सर्वच क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई , राणी लक्ष्मीबाई यांचा वारसा त्या समर्थपणे पेलत आहेत. आपल्या कार्याद्वारे विविध क्षेत्रात ठसा उमटवत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा 2023 अंतर्गत पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन नागोठणे येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यक्रमात मंत्री अदिती तटकरे यासह सामाजिक, शासकीय, पोलीस, वैद्यकीय सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 18 महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सन्मानित करण्यात येणाऱ्या नवदुर्गांचे कौतुक करताना पालकमंत्री सामंत म्हणाले, पोलीस दलात देखील विविध पदांवर कार्यरत राहून आमच्या महिला भगिनी उत्तम कामगिरी बजावत असून त्या दुर्गामातेचा अवतार आहे. मुलींना स्वसंरक्षणासाठी सक्षम होतील असा उपक्रम व प्रशिक्षण पोलीस दलाने राबवावा त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ तसेच बचत गटांच्यासाठी काम करणाऱ्या महिला समन्वयकांना रत्नागिरी जिल्ह्याच्या धर्तीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोबाईल फोन देण्यात येतील ज्यामुळे त्यांचे ते काम कार्यक्षमपणे करू शकतील, असे ते म्हणाले.
विशेष नवदुर्गा पुरस्कार स्वीकारल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .त्या म्हणाल्या, नवरात्र निमित्ताने हा सन्मान केला जात असून या उत्सवात देखील महिला पोलीस अधिकारी पासून ते गृहिणींपर्यंत सर्व महिला उत्साहाने सहभागी असतात त्यांच्या व्यस्ततेमुळे हा सन्मान सोहळा नवरात्र नंतर होत आहे. महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या मुलांना देखील पुरेसा वेळ देऊ शकत नाही, याची खंत त्यांना वाटत असेल पण त्यांच्यामुळेच समाजातील इतर सर्व मुलं सुरक्षित असतात. नवदुर्गांच्या कार्याचा सन्मान हा महत्त्वाचा आहे. असे सांगून सन्मान झालेल्या विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याची माहिती देऊन मंत्री तटकरे यांनी गौरव केला.
कार्यक्रमात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पोलीस दलात जवळपास 30 टक्के महिला असून त्या आपली जबाबदारी सक्षमतेने पूर्ण करीत आहेत . डायल 112 च्या माध्यमातून पथकाचा जिल्ह्यातील सरासरी रिस्पॉन्स टाईम सहा मिनिट आहे . शहरी व ग्रामीण दुर्गम भागात देखील डायल 112 वर कॉल प्राप्त झाल्यानंतर पथक तातडीने पोहोचते असे त्यांनी सांगितले.