रायगड, महाड अन् दुर्घटना; रायगडवासीयांची जखम जुनी, घाव नवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:05 AM2023-07-21T10:05:45+5:302023-07-21T10:06:51+5:30

खालापूरजवळील इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर दासगाव, सावित्री पुलाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या

The wound of Raigad residents is old, the wound is new; Bitter memories of Savitri bridge woke up | रायगड, महाड अन् दुर्घटना; रायगडवासीयांची जखम जुनी, घाव नवा

रायगड, महाड अन् दुर्घटना; रायगडवासीयांची जखम जुनी, घाव नवा

googlenewsNext

माधवी यादव-पाटील

नवी मुंबई : पावसाचे तांडव, काळीज चिरणाऱ्या दुर्घटना अन् मृतदेहांचे ढिगारे हे अलीकडे रायगड आणि पावसाळ्याचे जणू नवे समीकरणच तयार झाले आहे. दासगाव, सावित्री पूल, तळीये, तारिक गार्डन या जुन्या जखमा अद्याप भरून निघालेल्या नसतानाच बुधवारी, १९ जुलैला पुन्हा एकदा खालापूरजवळील कर्जत तालुक्यात इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली सापडले. रात्रीच्या अंधारात दरडीखाली संपूर्ण गाव गाडले गेले. काही कळण्याआधीच अनेकांना मृत्यूने गाठले.

महाड तालुक्यात २८ वर्षांपूर्वी पारमाची गावात दरड कोसळली होती. त्यानंतर महाड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या गावात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले ते आजअखेर कायम आहे.

 महाड तालुक्याला २००५ ला महापुराने वेढा घातला होता. २६ जुलै २००५ ला तालुक्यातील दासगाव, जुई, कोंडीवते व रोहन या गावात दरडी कोसळल्या होत्या. यामध्ये १९४ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो बेघर झाले होते. यावेळी एकट्या दासगाव भोईवाड्यात अचानक दरड कोसळली. या दरडीखाली ३८ घरे भुईसपाट झाली. यात ४८ जण मृत्युमुखी पडले. तालुक्यातील सह्याद्री वाडी, हिरकणी वाडी, पारमाची, माझेरी या गावांतून जमिनीला भेगा पडल्या.

 सावित्री आणि काळ नदी २ ऑगस्ट २०१६ या अमावास्येच्या रात्री जणू काळाचे रूप घेऊन धोक्याच्या पातळीबाहेर वाहत होत्या. रात्री साडेअकराला पाण्याचा प्रचंड लोंढा आला आणि पाहता पाहता सावित्री नदीवरील जुना पूल भुईसपाट झाला. मुंबई-गोवा महामार्गावर सावित्री नदीवरील  ब्रिटिशकालीन पूल कोसळून पुलासोबत अनेक जण वाहून गेले. क्षणात अनेकांचे संसारही उद्ध्वस्त झाले. या दुर्घटनेत जयगड-मुंबई आणि राजापूर-बोरिवली या दोन एसटी बस, एक तवेरा या गाड्यांसह ४० जणांना सावित्रीने आपल्या पोटात घेतले.

 २४ ऑगस्ट २०२० ला सायंकाळी ६.३० च्या दरम्यान महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात १६ जण मृत्युमुखी पडले, तर नऊ जण जखमी झाले. महाडमधील काजळपुरा परिसरातील ही इमारत आहे. या इमारतीत ४७ फ्लॅट होते, तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७० ते ८० रहिवासी अडकले होते. 

 पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे २२ जुलै २०२१ ला रात्री दहाच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन कोसळलेल्या दरडीखाली सुमारे १६ घरे भुईसपाट झाली. आणखी काही घरे दरडीसोबत उतारावर वाहून गेली. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले होते, केवनाळे येथे सहा जणांचा मृत्यू, आठ जखमी झाले.
रायगड जिल्ह्यात २२ जुलै २०२१ ला धो धो पाऊस आणि नद्यांना आलेल्या महापुरातून स्वतःचा जीव वाचवणारा प्रत्येक जण उघड्या डोळ्याने घराचे होणारे नुकसान पाहत असताना दुपारी चारच्या सुमारास महाड तालुक्यातील एका गावावर दरड कोसळली अन् तळीये हे डोंगराखाली गडप झाले. तब्बल ८७ लोकांचा जीव गेला. 
 

Web Title: The wound of Raigad residents is old, the wound is new; Bitter memories of Savitri bridge woke up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.