वरसोली जिल्हा परिषद शाळेचा थीमबेस लर्निंग पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:17 AM2020-02-24T00:17:19+5:302020-02-24T00:17:30+5:30
विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय अभ्यासाची गोडी; निकालावर सकारात्मक परिणाम
- निखिल म्हात्रे
अलिबाग : तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेली वरसोलीची जिल्हा परिषद शाळा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शाळेत पोहोचेपर्यंत या शाळेविषयी मनात काहीच चित्र नव्हते. शाळेजवळ पोहोचलो आणि शाळेच्या भिंतीपलीकडून गोंगाट कानी आला. खरे तर तो गोंगाट नव्हताच, तो होता मुलांच्या उत्साहाचा ध्वनी. त्यांच्यात चाललेली मस्ती त्यांच्यातील उत्साह वाढवीत होती. ते मस्ती करीतच पाढे पाठांतर करीत होते. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक ‘थीमबेस लर्निंगच्या’ माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत आहेत. याच कारणामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढून त्याचे सकारात्मक परिणाम हे लागणाऱ्या निकालावरून स्पष्ट होत आहे.
शाळेतील प्रत्येक इयत्तेनुसार शिक्षण देण्याची थीम वेगळी आहे, परंतु प्रत्येक विषयाचा त्याच्याशी संबंध जोडूनच मुलांना शिकवले जाते. दप्तराच्या ओझ्यातून मुले मोकळी व्हावीत म्हणून त्यांना पुस्तके नाहीत, तर केवळ वही आणायला सांगितले जाते. ही शाळा डिजिटलाइज असल्याने शाळेत कॉम्प्युटर, एलईडी स्क्रीन, इंटरनेट, मोकळे मैदान, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह यासह अन्य सुविधा आहेत.
शाळेतील पाच शिक्षकांनी मेहनतीने, एकजुटीने या आदर्श शाळेची प्रगतशील वाटचाल सुरू ठेवली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची एवढी सुसज्ज संगणक लॅब बघून पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. ग्रामस्थांच्या सहकार्यातून या शाळेत सुरू झालेल्या ई-लर्निंगमुळे ही छोटी-छोटी मुले डिजिटल विश्वामध्ये रममाण होऊन शिक्षण घेत आहेत. पूर्वी प्राथमिक शाळेचा वर्ग शेणाने सारवण्यात जेवढे तल्लीन त्या वेळचे विद्यार्थी व्हायचे, त्यापेक्षा जास्त तल्लीन ही लहान मुले डिजिटल शिक्षण घेताना होत असल्याचे दिसून आले.
स्तुत्य उपक्रम
सुंदर हस्ताक्षर, बालसभा, रांगोळी रेखाटन, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कवायत, योगासने, सूर्यनमस्कार यांसारखे अनेक चांगले उपक्र म या शाळेचे पाच शिक्षक मनापासून राबवत आहेत. वाचनालय, बोलका व्हरांडा यासह चप्पल स्टँड, पिण्याच्या पाण्यासाठी आधुनिक फिल्टर, आकर्षक असा मोठा लॉन यासारख्या अनेक सुविधा या शाळेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा हवीहवीशी वाटते.
तुम्ही खेड्यात आहात की शहरात हा प्रश्न गौण आहे; तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सर्वांगीण उजाळा देणारे, तुमच्यापर्यंत केवळ माहिती न पोहोचवता, त्यापलीकडचे ज्ञान देणारे शिक्षक तुम्हाला लाभतात की नाहीत, हा भाग मुख्य आहे.
- विकास पाटील, शाळेचे मुख्याध्यापक
फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, दप्तराचे ओझे न बाळगता डिजिटलाइज शिक्षण, अभ्यासक्रम आधारितच नव्हे तर व्यावहारिक शिक्षण मुलांना दिले जात आहे. मुलांची गुणवत्ता व अकलन शक्ती वाढविण्यासाठी भर दिला जात आहे. शाळेचे हे प्रयोग खरोखरच सकारात्मक आहेत.
- गुरुनाथ दांडेकर, पालक
शाळेची वैशिष्टे : प्रशस्त इमारत, क्रीडांगण, निसर्गरम्य वातावरण
मिळालेले पुरस्कार, सन्मान : आदर्श शाळा, स्वच्छ सुंदर शाळा
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व ग्रामस्थ पक्षभेद विसरून एकजुटीने मदत करतात. या शाळेतील मुले निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा यामध्ये तालुका पातळीची अनेक बक्षिसे मिळवितात. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे या मुलांचे हस्तकौशल्य नक्कीच वाखाणण्यासारखे आहे.