...तर मी मंत्रिपद सोडायला तयार - आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 04:09 PM2019-03-21T16:09:36+5:302019-03-21T18:40:14+5:30
मी ज्यांच्या सोबत जातो त्या पक्षाची सत्ता येते, त्यांना मुख्यमंत्री पद मिळते. त्या बदल्यात ते मला मंत्रिपद देतात तर बिघडले कुठे? असा सवाल रामदास आठवलेंनी केला.
महाड - रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार असतील तर त्यांनी रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्ष व्हावे असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या 92 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जाहीर अभिवादन सभेत आठवले बोलत होते.
यावेळी बोलताना आठवले म्हणाले की, मी ज्यांच्या सोबत जातो त्या पक्षाची सत्ता येते, त्यांना मुख्यमंत्री पद मिळते. त्या बदल्यात ते मला मंत्रिपद देतात तर बिघडले कुठे? असा सवाल रामदास आठवलेंनी केला तसेच माझ्या हाती आहे झेंडा निळा म्हणून त्यांचा आहे माझ्या मंत्रिपदावर डोळा ! अशी चारोळी म्हणत माझे मंत्रिपद घालविण्याचा विचार करण्यापेक्षा रिपब्लिकन ऐक्य करून समाजात मंत्रिपद वाढविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य करावे असा टोला रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना लगावला.
महाड चवदार तळे सत्याग्रहावेळी सनातनी विरोधकांनी सत्याग्रहींवर दगडफेक केली. हल्ले केले. रक्तबंबाळ होऊन सत्याग्रही भीमसैनिक डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे येऊन आम्हाला प्रतिहल्ला करण्याची परवानगी मागू लागले तेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना हिंसेचे उत्तर हिंसेने देऊ नका असे मी बजावले असं रामदास आठवले यांनी सांगितले.
समाजात विनाकारण तेढ निर्माण करणे योग्य नाही. मागसावर्गीयांसह सवर्ण सर्व समाज एकत्र आला पाहिजे. भारतीय दलित पँथर च्या शाखा स्थापन करताना मी सांगत होतो की सवर्ण समाजाविरुद्ध दलित पँथर नाही. समाजात समता निर्माण झाली पाहिजे या साठी मी काम करीत असून समाजिक ऐक्यासाठी आपण शिवशक्ती भीमशक्ती एकत्र केली. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी मी पहिली मागणी केली होती असा दावा रामदास आठवले यांनी केला.
काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून भांडणे लावत आहेत असा आरोप रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला. मी मात्र दोन समाजातील वाद मिटवितो. आपसात संघर्ष करणे योग्य नाही. अंतर्गत लढण्यापेक्षा पाकिस्तानला आम्ही धडा शिकवू असंही रामदास आठवले यांनी सांगितले