माणगाव : ताम्हिणी घाटात एका वळणावर बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. हा अपघात शनिवारी सकाळच्या सुमारास झाला. या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झालेत. बसमधून पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एका खासगी कंपनीचे ५७ कर्मचारी रायगडातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी निघाले होते.
घाटातून बस उतरत असताना पर्यटकांनी बस हळू चालवा, असे सांगूनही चालकाने दुर्लक्ष केले. त्याचवेळी बसवरील ताबा सुटल्याने गाडीला अपघात झाला. पुणे-दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत हा अपघात झाला. यात कांचन मारुती पाटील (२० वर्षे, रा. सावरगाव गेट, ता. भोकर, जि. नाशिक) व सुरभी रवींद्र मोरे (२२ वर्षे, रा. मांडवे, शहादा, नंदुरबार) यांचा जागीच मृत्यू झाला.
वाहतूक ठप्प या अपघातामुळे ताम्हिणी घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. क्रेनच्या मदतीने बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.
पोलिस, रेस्क्यू टीमची मदतअपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिस, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी स्थानिकांच्या सहकार्याने अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना बाहेर काढत रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे हलविले. अपघातातील गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी पनवेल, मुंबई येथे हलविण्यात आले आहे.