...तर ढाकमधील मतदार बहिष्कार टाकतील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 12:15 AM2019-10-09T00:15:42+5:302019-10-09T00:17:04+5:30
कर्जत विधानसभा मतदारसंघात दुर्गम भागात असलेले ढाक येथील मतदान केंद्र निवडणूक यंत्रणेने दुर्गम भागातून हलवून खाली पायथ्याशी आणले आहे.
कर्जत : १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघात असलेले ढाक हे दुर्गम भागातील मतदान केंद्र हलविण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या गावाचे अस्तित्व हरवून जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे. मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी न ठेवल्यास ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जत विधानसभा मतदारसंघात दुर्गम भागात असलेले ढाक येथील मतदान केंद्र निवडणूक यंत्रणेने दुर्गम भागातून हलवून खाली पायथ्याशी आणले आहे. त्यांच्या ग्रामपंचायतीमधील वदप येथील संजयनगरमध्ये असलेल्या अंगणवाडी केंद्रात नवीन १५६ क्रमांकाचे मतदान केंद्र सुरू होणार आहे. मात्र, निवडणूक यंत्रणेच्या या नवीन बदलाबद्दल आक्षेप ढाक ग्रामस्थांनी घेतला आहे. त्याबाबत ७ आॅक्टोबर रोजी ढाक ग्रामस्थांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे आपली फिर्याद मांडली. त्या वेळी ढाक ग्रामस्थ निवृत्ती ढाकवळ, मोहन ठाकरे, मनोज ढाकवळ, दामू ढाकवळ, बळीराम ठाकरे, गोविंद ढाकवळ, पप्पू ठाकरे, राजू ठाकरे आदीसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी या सर्व ग्रामस्थांनी आपल्या गावाचे अस्तित्व हरवून जाऊ शकते. आमचे गाव महसुली गाव असूनदेखील त्या ठिकाणी मतदानकेंद्र नसल्याने हा आमच्यावर अन्याय आहे, अशा तक्रारी केल्या.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी दुर्गम भागातील मतदानकेंद्र आणि इमारतीत पहिल्या मजल्यावरील मतदानकेंद्रे ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने हालविण्यात येत आहेत. आपल्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक होत असलेल्या ठिकाणी जी मतदानकेंद्र इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर असतील तर ती तळमजल्यावर घ्यावीत आणि दुर्गम भागातील मतदानकेंद्रदेखील मतदारांना सोयीचे होईल, अशा ठिकाणी घेण्याचे आदेश होते. त्यानुसार कर्जत विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघातील खोपोली शहरातील विहारी भागातील तीन आणि वरची खोपोली एक असे चार मतदानकेंद्र हे पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर आणले आहे. तर कर्जत तालुक्यात चार मतदानकेंद्र ही दुर्गम भागात असून त्यातील १५६ ढाक हे मतदानकेंद्र खाली पायथ्याशी आणण्याचा निर्णय घेतला आहे.
एकू ण१८३ मतदार
वदप येथील संजयनगर
भागात असलेल्या अंगणवाडी केंद्रात ढाक येथील १८३ मतदार असून निवडणूक यंत्रणेचा हा निर्णय मान्य नसल्याने ग्रामस्थांनी २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.