पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:05 AM2018-08-06T02:05:14+5:302018-08-06T02:05:34+5:30
पोशीरमध्ये पथदिवे बसवून अवघे एक वर्ष झाले आहे.
- कांता हाबळे
नेरळ : पोशीरमध्ये पथदिवे बसवून अवघे एक वर्ष झाले आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून दिवे बंद आहेत, त्यामुळे परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शिवाय, काही समाजकंटक रात्रीच्या वेळी घरांवर दगडफेक करीत असल्याचेही समोर येत आहे.
पोशीर ग्रामपंचायतीने ७३ हजार २२० इतक्या रकमेचे १३५ दिवे खरेदी केले होते. तसेच ते पोलवर बसवण्याकरिता प्रतिदिवा प्रतिपोल १०० रु पये मजुरी याप्रमाणे १३,००० इतका खर्च करून पोशीरमध्ये सर्व प्रभागांत पथदिवे बसविले होते. या पथदिव्यांना दोन वर्षांची वॉरंटीही देण्यात आलेली होती; परंतु हे पथदिवे बसविल्यानंतर महिन्याभरातच बंद पडले. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत बंद दिव्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यावर सदर बंद दिवे रिप्लेस करून विद्युत पथदिवे पूर्ववत करण्यात येतील, असा शब्द सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी ग्रामसभेला दिला होता. त्यानंतर नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी पोशीरमधील पथदिव्यांची स्थिती जैसे थे च आहे. रस्त्यावरील दिवे बंद असल्याने रात्री पोशीरमधील रस्त्यांवर अंधारच अंधार असतो. देवपाड्यातही तीच परिस्थिती
आहे.
पोशीर गावात काही ठिकाणी गेले काही दिवस आकस्मिक दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. गणेशोत्सवाला अवघा एक महिना उरलेला असताना गावातील रस्त्यांवर अंधार असल्याने हीच स्थिती गणेशोत्सवात राहिली तर गावकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागणार हे निश्चित. पोशीरमधील ग्रामस्थांनी पथदिवे बदलण्याची मागणी केली आहे. मात्र, दहा दिवस झाले तरी अद्याप पथदिवे पूर्ववत करून न बसविल्याने हे दिवे बसविण्यासाठी ग्रामपंचायत अद्याप मुहूर्त शोधत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
पोशीर ग्रामपंचायतीतील मनमानी कारभार अनेकदा चव्हाट्यावर आलेला असताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे देखील ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यातच पोशीरमधील या बत्तीगुल प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण पसरले आहे.
>पोशीरमधील पथदिव्यांमध्ये पाणी जात असल्याने पथदिवे बंद पडले आहेत, ते बदली करण्यासाठी दिले आहेत. दोन दिवसांत दिवे मिळाल्यानंतर पोलवर बसवण्यात येतील.
- हरिश्चंद्र निरगुडा, सरपंच, ग्रा. प. पोशीर
>दिवाबत्ती ही मूलभूत सुविधादेखील धड पुरवली जात नाही, त्याकरिता वारंवार आठवण करून द्यावी लागते हे दुर्दैव आहे. दिवे रिप्लेस करण्यासाठी एक वर्ष लागते ही हास्यास्पद बाब आहे.
- प्रवीण शिंगटे, ग्रामस्थ, पोशीर
पोशीर ग्रामपंचायतीचा कारभार संवेदनाशून्य आहे, त्यामुळेच पोशीरमध्ये अशा घटना घडत आहेत. या कालावधीत काही अपघात अथवा अनुचित प्रकार घडल्यास त्यास ग्रामपंचायत जबाबदार असेल.
- मनेष राणे, माजी सदस्य, पोशीर