- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली - पनवेल विधानसभा मतदारसंघात जवळपास दीड लाख मतदार वाढले आहेत. शिवाय, अजूनही नोंदणी सुरूच असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मावळमधील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून पनवेलचे नाव घेण्यात येत आहे.मावळमधील सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार करायचा झाला तर पिंपरी, चिंचवड व पनवेलला शहरात वसाहत आहेत. त्यातही पनवेलमध्ये झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. होऊ घातलेले राष्टÑीय-आंतरराष्टÑीय प्रकल्प, अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे येथील लोकसंख्या पर्यायाने मतदारांची संख्या वाढत आहे.पनवेल विधानसभा मतदारसंघात ग्रामीण आणि शहरी असे दोन विभाग असले तरी दोन्ही ठिकाणी लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत असून, त्यापाठोपाठ विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. २०१४ च्या तुलनेत पनवेलमध्ये मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मावळच्या उमेदवारासाठी पनवेल मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पनवेलमध्ये फेऱ्या वाढल्या आहेत.पनवेल मतदारसंघात एक लाख ४३ हजार इतके मतदार पाच वर्षांत वाढलेले आहेत. अजूनही नोंदणी सुरू असल्याने त्यात आणखी दहा हजारांची भर पडण्याची शक्यता आहे.
पनवेलमध्ये दीड लाख मतदार वाढले, मतदार नोंदणी सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 4:00 AM