पोलादपूरमधील २३ गावे, १०६ वाड्या दुष्काळग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:42 PM2019-05-12T23:42:19+5:302019-05-12T23:42:27+5:30

तालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजिरे येथील धरण सोडल्यास तालुक्यात एकही धरण नाही.

There are 23 villages in Poladpur, 106 wards drought-affected | पोलादपूरमधील २३ गावे, १०६ वाड्या दुष्काळग्रस्त

पोलादपूरमधील २३ गावे, १०६ वाड्या दुष्काळग्रस्त

googlenewsNext

- प्रकाश कदम

पोलादपूर : तालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजिरे येथील धरण सोडल्यास तालुक्यात एकही धरण नाही. देवळे धरण नावाला असून त्यात पाण्याचा दुष्काळ आहे, पाण्याच्या योग्य नियोजनअभावी फेब्रुवारीपासून तालुक्यातील बऱ्याच गावात पाणीटंचाई जाणवते. पाण्याअभावी शेतीचे अतोनात नुकसान होते. एप्रिल महिना सुरू झाला की तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागते, वाढत्या तपमानामुळे नदी, नाले, ओढे कोरडेठाक पडतात. आतापर्यंत २३ गावे आणि १०६ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडला आहे. यात दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावपाड्यांची संख्या अधिक असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकावे लागत आहे.
मागील दहा वर्षांत पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याचा मागोवा घेतला तर या गाववाड्यांवर विंधण विहिरी, विहिरींची दुरुस्ती, साठवण टाकी, नळ पाणीपुरवठा योजना, छोटे तलाव आदी विकासकामांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, आजमितीस एकाही गाववाडीची पाणीटंचाईची समस्या सोडवण्यास पूर्ण अपयश आले आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाची उदासीनता, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे तहानलेल्या गाव वाड्यांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात या नद्या तुडुंब भरून वाहत असतात, तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहते. या तालुक्यात एकूण नऊ धरणे प्रस्तावित आहेत. त्यातील किनेश्वर, लोहारे खोंडा, कोंढवी धरणाचे काम प्राथमिक टप्प्यात चालू झाले आहे. अन्य ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्यामुळे भूसंपादनाचे काम होऊ शकले नाही, तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कामे चालू होऊ शकली नाहीत. सध्या तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण विभागामार्फत आराखड्यात गोवेळे, देवळे, कापडे बु., बोरघर, आडवले, येथे बंधारे सुचविण्यात आले. मात्र, मापदंडात बसत नसल्याचे कारण देत बहुतांश गावांतील बंधारे रद्द करून प्रशासनाने आपला नाकर्तेपणा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. हिरवळ प्रतिष्ठान, स्वदेशसारख्या स्वयंसेवी संस्था लोकसहभागातून बंधारे घेत पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची भटकंती सुरूच
दरवर्षी कातळी बंगला, पवारवाडी, काळवली, भोसलेवाडी, विठ्ठलवाडी, महाळगूर-मोरेवाडी, गोळेगणी, पिंपवळवाडी, आंबेमाची, पळचीळ-धनगरवाडी, कोसमवाडी, चिरेखिंड, महाळगूर, तामसडे, वाकण, धामणेचीवाडी, मुरावाडी, गावठाण, केवनाळे, पळचीळ-जळाचीवाडी, किनेश्वर-पेढावाडी, बोरघर-बौद्धवाडी, वाकण-बौद्धवाडी, वडघरबुद्रुक, कामथे-आदिवासीवाडी, जांभाडी, कोडबे कोंड, चाळीचा कोंड, काळवली-तिवडेकर मोहल्ला, पाटीलवाडी, बौद्धवाडी, कुंभळवणे, क्षेत्रफळ, आमळेवाडी, तुटवली, धनगरवाडी व बौद्धवाडी, महादेवाचा मुरा, येळंगेवाडी, वडघर-सणसवाडी, केवनाळे, अंबेमाची देऊळवाडी, फौजदारवाडी, गोवेले, तळ्याची वाडी, जननीचा माळ, बाळमाची, मोरसडे, पोफळ्याचा मुरा, देवळे, दाभील, भोगाव-पार्टेवाडी या वाडींसह साळवीकोंड, चांभारगणी, गोवळे अशा २४ गावे व १०६ वाडी-पाड्यांवर पाण्याचे संकट ओढावते.

पोलादपूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता मोठ्या धरणाऐवजी प्रत्येक नदीवर साखळी पद्धतीने बंधारे झाल्यास तालुक्याची पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. संबंधित अधिकारीवर्गाने याबाबत आराखडा तयार करून तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवावा.
- बबिता दळवी, सरपंच, देवळे

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. जलयुक्त शिवारमधील आराखड्यातील कामे पूर्ण झाली नाहीत. जलसंधारणकडून बंधाºयाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाणीप्रश्न तसाच राहिला आहे.
- सीताराम पोकळे,
केवनाळे, ग्रामस्थ

Web Title: There are 23 villages in Poladpur, 106 wards drought-affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.