रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात ६० स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:12 AM2018-08-18T05:12:30+5:302018-08-18T05:13:44+5:30
पावसाचा आणि हवामानाचा अंदाज नक्षत्रावरून बांधून शेतकरी पिकांचे नियोजन करतात, परंतु अनेकदा हे अंदाज चुकल्याने पिकाचे नुकसान होते.
- जयंत धुळप
अलिबाग - पावसाचा आणि हवामानाचा अंदाज नक्षत्रावरून बांधून शेतकरी पिकांचे नियोजन करतात, परंतु अनेकदा हे अंदाज चुकल्याने पिकाचे नुकसान होते. यावर मात करून शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज आणि त्या आधारे कृषी सल्ला देण्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत एकूण ६० स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. यंदाच्या खरीप हंगामात स्वयंचलित केंद्राचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके यांनी दिली आहे. उपग्रहाशी संलग्न ६० स्वयंचलित हवामान केंद्रात दर १० मिनिटांनी हवामानविषयक नोंदी संकलित केल्या जातात. त्यानुसार अचूक हवामान अंदाज बांधून त्यावर आधारित कृषीसल्ला शेतकºयांना देण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती एकसमान नाही. परिणामी किनारीभागात पडणारा पाऊस आणि पूर्वेकडील डोंगरी भागातील पाऊस यामध्ये तफावत असते. महाड-पोलादपूरमध्ये अतिवृष्टी होवून सावित्री नदीला पूर येतो. त्याच वेळी उरण, पनवेल, खालापूर तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. परिणामी सध्याच्या प्रचलित मंडळ स्तरावर असलेल्या पर्जन्यमापकातून प्राप्त पावसाच्या नोंदींची सरासरी काढून जिल्ह्यातील शेतकºयांकरिता देण्यात येणारा कृषी सल्ला अचूक असेलच असे सांगता येत नाही. परिणामी अनेकदा शेतकºयांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे प्रसंग यापूर्वी अनेक घडले आहेत.
दर १० मिनिटांनी घेतल्या जातात नोंदी
या हवामान केंद्राकडून प्रत्येक तालुक्यातील ४ वेगवेगळ्या ठिकाणची दर १० मिनिटांची पर्जन्यमानाच्या नोंदीबरोबरच वाºयाचा वेग, वातावरणातील आर्द्रता ही माहितीही उपलब्ध होत आहे. याशिवाय हवामानाचे पूर्वानुमान, कीडरोगांची पूर्वसूचना यासारख्या बाबींसाठी या केंद्रांची मोठी मदत होणार आहे. लहरी पर्जन्यराज्याचा पूर्वअंदाज घेऊन आता शेती करता येणार असल्याने, पिकांच्या नुकसानीचे प्रमाण कमी होणार असल्याचा विश्वास कृषी विभागाचा आहे.