महाराष्ट्रात ९३७ रुग्णवाहिका उपलब्ध, जस्ट डायल 108
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:09 AM2020-02-22T01:09:00+5:302020-02-22T01:09:30+5:30
वैभव बाजारे यांची माहिती : सानेगाव येथील आश्रमशाळेत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
रोहा : जनतेला कुठल्या ना कुठल्या कारणाने १०८ सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेची गरज भासते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची गरज आहे. व्यक्तीला निसर्गनिर्मित व मानवनिर्मित अशा दोन प्रकारच्या आपत्तींना सामोरे जावे लागते. गरोदर माता, आपघातांच्या वेळी, व्यक्ती आजारी पडला तर १०८ ही रुग्णवाहिका उपयोगी पडते. महाराष्ट्रात ९३७ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. एएलएस व बीएलएस अशा दोन प्रकारच्या रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिका २४ तास सातही दिवस चालू राहतात. १०८ रुग्णवाहिका सुरू होऊन सहा वर्षे झाली. याबद्दलची माहिती महाराष्ट्र शासन १०८ चे अधिकारी वैभव बाजारे यांनी दिली.
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव येथे बुधवारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यक्रमात बाजारे बोलत होते. आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख जयपाल पाटील यांनी आग लागल्यावर घ्यावयाची काळजी प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थी व शिक्षकांना समजावून सांगितली. पूर, पाण्याचे व्यावस्थापन, वृक्षांचे महत्त्व, साप चावल्यास घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन करण्याकरिता कोणत्या साधनांचा वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिके दाखविली. त्याचप्रमाणे मुलींची छेडछाड जर कोणी करत असेल तर त्यांनीही काळजी घेण्याकरिता जवळच्या पोलीस स्टेशनचा नंबर घेऊन पोलिसांपर्यंत ही गोष्ट गेल्यास किती मिनिटात पोलीस हजर राहतात याचे प्रात्यक्षिक दाखविले. खरोखरच २० मिनिटांत सानेगाव आश्रमशाळेत पोलीस दाखल झाल्याचे दिसून आले. या वेळी सुयोग आंग्रे, शाळेचे मुख्याध्यापक मधुकर फसाळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत जाधव आदींसह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.